इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव निश्चित, आमदार कुणाल पाटील यांचा विश्वास
धुळे : देशातील २८ पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. सन २०१९ च्या निवडणुकीत या घटक पक्षांना तब्बल ६५ टक्के मतदान झाले होते. भाजपला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी केवळ ३५ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. महागाई, बेरोजगारी, मराठा आरक्षण या मुद्यांवर त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ चा नारा देण्याचा कोणताही इरादा नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना धुळे लोकसभेची जागा काँग्रेसने लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांसह माझा आग्रह असल्याचे मत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केले.
भारत जोडो यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवारी राज्यभर जन संवाद यात्रा काढण्यात आली. याबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी धुळे येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या वर्षी काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी १३५ दिवसात ४ हजार किलोमीटर पायी प्रवास करून पदयात्रा काढली. या पदयात्रेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसामान्य माणसाला ते भेटले. लोकांच्या भावना जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात जनसंवाद यात्रा सुरू केली. सर्वसामान्य माणसाला जोडण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम काँग्रेस करीत आहेत. दोंडाईचा येथे गुरुवारी सकाळी मी स्वतः पदयात्रेत सहभागी झालो.
गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. जनतेचा मोदी सरकारवर रोष आहे. हा रोष संवाद यात्रेत जाणवतो. गॅस सिलेंडरचा दर ३५० वरून ११०० रुपयांवर पोहचला होता. सिलेंडर दरवाढ करून कोट्यावधी रुपये जनतेच्या खिशातून मोदी सरकारने काढून घेतले. पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी कमी केले. पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले असताना भारतात मात्र दरवाढ केली. पक्ष फोडून सत्तेत येण्याचे भाजपचे धोरण आहे. राज्यातील जनतेत सरकार विरोधात असंतोष आहे. शेतकरी देखील सरकारवर चिडले आहेत. मागील वर्षी झालेल्या गारपिटीचे पैसेच शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सत्तेत आल्यानंतर १५ दिवसात आरक्षण देवून असे सांगणारे सत्तेत येवुन पंधरा महिने झाले तरी मराठा आरक्षण द्यायला तयार नाहीत. हे लाठीमार सरकार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनसंवाद आणि पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. धुळे ग्रामीण अथवा साक्रीमध्ये काँग्रेस भक्कम स्थितीत आहे. शिंदखेडा आणि शिरपूरमध्ये देखील काँग्रेसचे संघटन आणि ताकद चांगली आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर नव्हे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून मनपाच्या सत्तेत जाणार असेही आ. पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपात ज्याला मिळेल त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार. ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. धुळे लोकसभेत काँग्रेसला चांगला जनाधार आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसने लढवावी, असा माझ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह राहील असेही आ. पाटील म्हणाले.
या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, मुजफ्फर हुसैन, यशवंत खैरनार, गुलाबराव कोतेकर, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, अशोक सुडके, साबीर खान, पंढरीनाथ पाटील, प्रमोद जैन, भानुदास गांगुर्डे, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.
हेही वाचा