अट्टल चोरट्यांची गॅंग धुळे एलसीबीच्या जाळ्यात
धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या चार गुन्ह्याचा तपास लावला असून एक स्विफ्ट कार , सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल हँडसेट, व दोन मोटर सायकली असा तब्बल चार लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ७ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
साक्री पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या राकेश विश्वास खैरनार, यांच्याकडील घरफोडीतील मुद्देमाल पोलिसांना मिळाला असून यात मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने असा ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. राकेश खैरनार रा. दहिवेल यांनी ४ सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली होती. ही चोरी पप्पू बंब उर्फ साकीर शहा इब्राहिम शहा वय( ३३) रा. भोईवाडा, वडजाई रोड धुळे, मारी उर्फ इस्माईल नजीर शेख ( २०) रा. वडजाई रोड, धुळे तोसिफ कपाशी उर्फ तोसिफ शहा अजिज शहा ( वय ३२) रा. अंबिका नगर,धुळे यांनी केली असल्याचे तपासात उघड झाले. या गुन्ह्यासाठी त्यांनी एम एच ०३ ए . एफ ०४९८ या स्विफ्ट कारचा वापर केला होता . अशी कबुली संशयीताना पोलिसांसमोर दिली संशयीतांकडून एलसीबी पथकाने २७ हजार ३०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे .
देवपुरातील स्वामीनारायण रस्त्यावर असलेल्या पद्मश्री अपार्टमेंट मधील संदीप मगन भावसार यांच्याकडे ३० जुलै २०२३ रोजी घोरफोडी झाली होती. यात ३० हजार ३०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविण्यात आली होती.ही चोरी सउद सलीम अन्सारी रा. ८० फुटी रोड धुळे, इमरान शेख रफिक रा. ग्यारा हजार कॉलनी मालेगाव, हेमंत किरण मराठे रा. ट्रान्सपोर्ट नगर धुळे व अमोल रामदिन परदेशी रा. सुशील नगर, जमनागिरी रोड, धुळे यांनी केली असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. या संशयीतांकडून पोलिसांनी संपूर्ण ३० हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
मालेगाव येथील छावणी पोलीस ठाण्यात व आझाद नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील हिरो होंडा फॅशन प्रो व ड्रीम युगा कंपनीच्या प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीच्या मोटार सायकली ही इमरान शेख रफिक याने मालेगाव येथून चोरी करून धुळे येथे विक्रीसाठी दिल्या होत्या. त्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पप्पू बंब उर्फ शाकीर शहा यांच्या घरासमोर उभी असलेली विविध गुन्ह्यांमध्ये वापर झालेली एम एच०३- ए एफ ०४९८ ही ३ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार ही पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेत असलेले सऊद अन्सारी व हेमंत मराठे या दोघांविरुद्ध १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून अमोल परदेशीवर एक तर अन्य चौघांविरुद्ध एक पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील , पोसई बाळासाहेब सूर्यवंशी , अमरदीप मोरे, संजय पाटील, संतोष हिरे, प्रकाश सोनार, सुरेश भालेराव, अशोक पाटील, पंकज खैरमोडे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप, जितेंद्र वाघ , हर्षल चौधरी, कैलास महाजन, राजू जाधव यांच्या पथकाने केली.
हेही वाचा