आमदार कुणाल पाटील यांना मंत्रीपद मिळणार! भविष्यात मुख्यमंत्रीही होणार!! पक्षश्रेष्ठींची संकेत
धुळे (प्रतिनिधी) : धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे आता सीनियर आमदार झाले असून त्यांना राज्याचे नेतृत्व करायचं आहे, असे सांगत कुणाल पाटील यांना मंत्रीपद तर मिळणारच पण भविष्यात ते रोहिदास दाजी पाटील यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्रीही होऊ शकतात, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी धुळ्यात दिले.
काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या समारोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. धुळे शहरानजीकच्या नकाने गावालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी हा समारंभ पार पडला. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस शरद आहेर, पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, अश्विनी पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमदार कुणाल पाटील हे आता सीनियर आमदार झाले आहेत. त्यांना संपूर्ण राज्याचे नेतृत्व करायचे आहे. रोहिदास दाजी पाटील यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांना पूर्ण करायचे आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याची जबाबदारी कुणाल पाटील यांच्या धर्मपत्नी अश्विनी पाटील यांनी सांभाळावी आणि कुणाल पाटील यांना राज्यात काम करण्यासाठी मोकळीक द्यावी. सीनियर आमदार असल्याने काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांना काय बक्षीस द्यायचे ते आम्ही देऊच. पण रोहिदास दाजींचे अपूर्ण राहिलेले स्वप्नदेखील आम्ही पूर्ण करू. आमच्याकडून पूर्ण झाले नाही तर तुम्ही सर्वांनी ते स्वप्न पूर्ण करावे, अशा शब्दात त्यांनी कुणाल पाटील यांना मंत्रीपद तर मिळणारच पण भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असे संकेत दिले.
धुळे जिल्ह्यात सह राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकार सत्तेचे राजकारण करीत आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात 25 टक्के विम्याची अग्रीम रक्कम तत्काळ जमा करावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही बाळासाहेब थोरात यांनी दिला.
भाजपच्या जनता विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून नको त्या गोष्टींवर हेतूपूर्वक चर्चा घडवून आणली जाते. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शास्त्रज्ञांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. मात्र शास्त्रज्ञ बाजूलाच राहिले आणि पंतप्रधानच माध्यमांमध्ये जास्त दिसले. भारतात घेतलेल्या जी-20 परिषदेसाठी अवाढव्य खर्च केला. तो सर्व खर्च जनतेच्या माथी मारला जाईल आणि त्यामुळे महागाईत भर पडेल. त्या खर्चात मोठमोठे सिंचन प्रकल्प उभारले गेले असते. परंतु भारतीय जनता पक्षाला विविध जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून देशात भीतीचे वातावरण तयार करायचे आहे. राज्यघटनेवर आणि जनतेच्या विचार स्वातंत्र्यावर गदा आणून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेने देशातील माणूस पुन्हा जोडला गेला आहे. भारत जोडो यात्रा आणि जनसंवाद यात्रेमुळे लोकांमध्ये जनजागृती झाली.
जिल्ह्याच्या विकासात माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अक्कलपाडा धरण झाले, म्हणूनच आज नदीला पाणी आले. भावी पिढ्या समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले आहे, अशा शब्दात त्यांनी रोहिदास पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाजप सरकारवर कठोर टीका केली. पत्रकार निरंजन टकले यांनी राज्यात आणि देशात घडलेल्या विविध घटना आणि दुर्घटनांचे दाखले देत भारतीय जनता पार्टीच्या जातीयवादी राजकारणाचा बुरखा फाडला. आमदार कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस शरद आहेर, प्रा. विलास चव्हाण आणि योगेश पाटील यांनीही काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा गायत्री जयस्वाल, बाजीराव पाटील, रमेश श्रीखंडे, साबीर खान, उत्तमराव देसले, लहू पाटील, भगवान गर्दे, प्रमोद जैन, डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान पाटील, रणजीत पावरा, मनोहर पाटील, विमल बेडसे, अरुण पाटील, धीरज अहिरे, साहेबराव खैरनार, अशोक सुडके, एन. डी. पाटील, मुजफ्फर हुसैन, शकील अहमद, सुरेखा बडगुजर यांच्यासह धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा