संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट ! रावसाहेब दानवे यांची बोचरी टीका
धुळे : शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट आहे. मालक दिसल्यावरच टिवटिव करतो, अशी बोचरी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदखेड्यात केली.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने, भाजप सरकारने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण गुंडाळले, असा आरोप संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी रात्री गेलो होतो त्यावेळी हे दरवाजा बंद करून झोपले होते. मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या आम्ही मान्य केल्या असून दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्यवाही करण्याची वाटचाल सुरू आहे. पण यांनी कधी तोंड दाखवलं नाही. हा फक्त पोपट आहे पिंजऱ्यातला. मालक आल्यावरच टिवटिव करत असतो. उद्धव ठाकरे दिसल्याशिवाय काही बोलतच नाही. पिंजऱ्यातले पोपट काय बोलतील याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, अशी बोचरी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
शिंदखेड्यात लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा
नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला पुढील काळात पाच ते सहा दिवसाआड नाही तर एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते 21 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार जयकुमार रावल विरोधकांवर सडकून टीका केली. राज्यात युती शासनाच्या काळात 21 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. शहरात काही वर्षांपूर्वी पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नव्हते. मात्र पुढील काळात शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले की, गेल्या 40 वर्षांपासून रखडलेल्या सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस निधी मिळून दिला. 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, नारायण पाटील, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, कामराज निकम, जिल्हा परिषद सभापती महावीरसिंह रावल, संजीवनी सिसोदे, पंचायत समिती सभापती वंदना ईशी, उपसभापती रणजीत गिरासे, भिला माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख, युवराज माळी, सुभाष माळी, मीरा मनोहर पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण माळी, चेतन परमार, जितेंद्र जाधव, किसन सकट, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
उधना-पाळधी ‘मेमू’ भुसावळपर्यंत धावली
पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर धावणाऱ्या उधना-भुसावळ ‘मेमू’ गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी सायंकाळी दोंडाईचा रेल्वे स्थानकावर हिरवी झेंडी दाखविली. सुमारे 800 प्रवाशांना घेऊन ही गाडी रात्री सव्वा दहाच्या सुमारास भुसावळला पोहोचली. दरम्यान, पुढील वर्षात देशात चारशे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येतील, अशी घोषणा दानवे यांनी कार्यक्रमात केली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, सरकारसाहेब रावल आदी उपस्थित होते. उधना-पाळधी दरम्यान धावणारी मेमू गाडी जळगावपर्यंत नेण्याची प्रवाशांची मागणी होती. ती मान्य करताना ही गाडी भुसावळपर्यंत नेण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, लवकरच पश्चिम रेल्वे लाईनवरील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्यासाठी नवीन गाडी सुरू करण्यात येणार असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
हेही वाचा