लोकनेते : आमदार कुणाल बाबा
जे विद्यार्थिदशेपासूनच राजकारणातील बाळकडू प्यायले. सत्ता असो अथवा नसो, ज्यांचा वैचारिक पाया भक्कम आहे. ज्यांनी गेल्या २३ वर्षात नीतिमूल्ये अबाधित ठेऊन समाजकारण, राजकारण केले, जे कितीही संकटे आली तरी न डगमगता, मनाची घुसमट होऊ न देता, वैचारिक बैठक मोडू न देता सामोरे गेले, जे भाजपमध्ये जाणार, अशा वावडय़ा उडविल्या गेल्या; परंतु ते अखेपर्यंत निष्ठेने काँग्रेस पक्षातच राहिले असे लोकनेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांचा दि. १८ सप्टेंबर हा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध…
खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी जनहितासाठी आपले आयुष्य वेचले आणि हाच वारसा त्यांचे कर्तृत्ववान सुपुत्र लोकनेते आ. कुणाल बाबा पाटील (Kunal Patil) आपल्या कार्यकर्तृत्वाने समर्थपणे चालवत आहेत. राजकीय क्षेत्रातील माणसांची प्रगती होते तसे त्यांच्यात बदल होतो, पण कुणाल बाबा यांच्यातील साधेपणा कायम आहे याचे मुख्य कारण म्हणजे दाजीसाहेबांचे राजकीय संस्कार. ग्रामीण राजकारण, आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष, विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांचे अध्यक्षपद या विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतांना आपल्या मनाचा तोल न ढळू देणे, समोर आलेल्या व्यक्तीच्या कामाची अचूकपणे आठवण ठेवणे, कोण काय बोलतो याकडे दुर्लक्ष करुन खिलाडू वृत्तीने राजकारण करणे ही कुणाल बाबांची खासियत म्हणावी लागेल. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणे आणि त्यांची आपुलकीने चौकशी करणे हा बाबांच्या दिनचर्येतील प्रमुख भाग आहे.
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, ‘पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा’ कमावण्याचा उद्योग, अनेक नेत्यांची पोकळ आश्वासने, सांगणार ते करणार नाही अशी सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून आदराचे स्थान निर्माण करणारे, आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले असे उत्साहाचा सळसळता झरा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनेते कुणाल बाबा पाटील. अशा लोकनेते असलेल्या व्यक्तिमत्त्वाचं एकच टॉनिक असतं आणि ते म्हणजे विपुल लोकसंग्रह. कुणाल बाबांचा लोकसंग्रह प्रचंड आहे. आमदार नसतांनाही तेवढाच होता जेवढा आज आहे. विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षांत त्यांचा मित्र गोतावळा असून विरोधी पक्षातही त्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून बाबांच्या भोवती सतत गर्दी पाहायला मिळते. त्या गर्दीत सर्व जाती धर्माचे, गरीब श्रीमंत लोक असतात. फक्त धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण खान्देशातील अनेक गरजू लोक त्यांच्या समस्या घेऊन बाबांना भेटतात. त्यात कोणी अन्यायपीडित असतो, कोणी विद्यार्थी असतो, कोणी पालक तर कोणी शेतकरी. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी बाबांचे प्रयत्न असतात. लोकनेते ही बिरुदावली काही मोजक्याच राजकीय नेत्यांना लावता येऊ शकते, त्यात आता आ. कुणाल बाबा पाटील या नावाची भर पडली आहे. लोकनेत्यांची परंपरा आता खंडित होत चालली आहे. तरुण पिढीमध्ये तर लोकनेत्यांची मोठी वानवा आहे. सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा मोठा समूह ज्यांच्या मागे सातत्यानं असतो, असे लोकनेते आता दुर्मिळ झाले आहेत. अशा परिस्थितीत कुणाल बाबांचं सर्वांना हवंहवंसं वाटणारं नेतृत्व उठून दिसतं. अनेक चढउतारांमधून जराही संयम ढळू न देता सतत कार्यप्रवण राहणं हे या लोकनेत्याकडून शिकण्यासारखं आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
आमदार पद स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही तर जनता जनार्दनासाठी आहे हे त्यांनी जाणलं. आपलं तन, मन, धन, सेवा, वेळ, शील, हृदय असं सगळं जनता जनार्दनाला अर्पण केलं. जनतेनंही त्यांना आपलं मानलं. सलग दोन वेळा धुळे ग्रामीण मतदार संघातून विजयची मोहर उमटवली. धुळे तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा, गाव समृद्ध व्हावे म्हणून त्यांची सतत धडपड सुरू असते. त्यांनी वेळोवेळी जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे, मंथन केले आहे, चर्चा घडवून आणली आहे. दुष्काळ, पाणी, शेती, वीज, महागाई, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, शेतीमालाचे भाव अशा प्रश्नांवर त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. आमदार झाल्यापासून त्यांनी धुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात शासकीय निधी खेचून आणण्याचे काम केले. ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, ऊर्जा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक कल्याण अशा कितीतरी विभागाचा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात आणला.
सामाजिक चळवळीत किंवा राजकारणात काम करत असताना अनेक वाईट प्रसंगांना सामोर जाव लागतं, मान-अपमान पचवावे लागतात…आणि ह्या सर्वांची तयारी ठेवावी लागते…राजकारण ही सुद्धा एक चळवळ आहे, या चळवळीत काम करताना अनेक प्रसंग येतात. मात्र ज्यांची नियत साफ असते, मनापासून जनसेवेचे व्रत स्वीकारलेले असते ते अशा प्रसंगांना धीराने सामोरे जातात. कुणाल बाबा यांचे व्यक्तिमत्त्व याच पठळीतील आहे. रोज भेटणाऱ्या असंख्य लोकांमध्ये विविध प्रकारच्या व्यक्ती त्यांना भेटत असतात. काही तर इतके भरकटलेले असतात, आमदारांना काहीही सांगतात, काहीही मागतात मात्र बाबा आपला संयम कधीच ढळू देत नाहीत. आज धुळे तालुका जवळपास टँकरमुक्त झाला आहे. याचे श्रेय अर्थातच पाणीदार आमदार कुणाल बाबांना द्यावे लागेल. काँग्रेस पक्षाच्या विचारांशी त्यांची बांधिलकी आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेली यशस्वी जनसंवाद यात्रा असो की खा. राहुलजी गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेतील त्यांचा आठवड्याभराचा सहभाग असो, त्यांच्या रोमारोमात काँग्रेस पक्ष असल्याचे दिसून येते. एक पक्ष, एक झेंडा, एक विचार तीन पिढ्या टिकवून ठेवणारे बाबांचे कुटुंब हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.
धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरापगड विचारांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बाबांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र उमदा नेता, धाडसी नेतृत्व, कधीच युद्धात माघार नाही अशी साहसी वृत्ती असलेला नेता असलेल्या कुणाल बाबांनी त्या विरोधी नेत्यांना धोबीपछाड देऊन आपले नेतृत्व सिद्ध केले. परवा माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात जनसंवाद यात्रा समारोप सभेसाठी येऊन गेले. उपस्थित जनसमुदाय पाहून ते आपल्या भाषणात म्हणाले, “आजच्या विचित्र परिस्थितीत एखाद्या नेत्यामागे एवढा मोठा जनसमुदाय असणे ही साधी सोपी गोष्ट नाही. कुणाल बाबा यादृष्टीने श्रीमंत आहेत. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दाजीसाहेबांना मिळाली नाही. आता मी प्रतीक्षेत आहे. मलाही मिळाली नाही तर कुणाल बाबांना मात्र शंभर टक्के मिळेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण मुख्यमंत्री होण्यासाठी जे गुण लागतात, ते सर्व बाबांकडे आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि अहिराणी या सर्व भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.” आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेली ही इच्छा पूर्ण होईल याबाबत समस्त खान्देशवासीयांना खात्री आहे.
कुणाल बाबांची राज्यात अभ्यासू आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारा कर्तव्यदक्ष नेता आणि लोकांचा नेता, लोकनेता अशी ओळख निर्माण झाली आहे. १८ सप्टेंबर रोजी बाबा वयाची ४९ वर्षे पूर्ण करुन ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. राजकारणात लागणारे सातत्य, वागण्यातून कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मनात निर्माण होणारा आदर व विश्वास, पक्षाला व कार्यकर्त्यांना बळ देणारा लढाऊ बाणा या गुणांसह ते पन्नाशीत प्रवेश करत आहेत… त्यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा!
– प्रकाश पाटील, विशेष कार्य अधिकारी,
मो. 9765311511
हेही वाचा