अजित पवारांबद्दल बेताल वक्तव्य, गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेचा राष्ट्रवादीने केला पायतान म्हणून वापर
धुळे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कुणाबद्दल काय बोलावे याचे भान नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबद्दल ते आक्षेपार्ह बोलले आणि गोपीचंद पडळकरसारख्या वाचाळविरामुळे सरकारची नाचक्की झाली. सरकारची बदनामी झाली. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आवर घालावा. सणासुदीचे दिवस असल्याने आम्ही आंदोलन केले नाही. मात्र गणेशोत्सव संपल्याच्या तीन दिवसाच्या आत आमदार पडळकर यांना काळे फासण्याचा इशाराही कैलास चौधरी यांनी दिला.
पत्रकार परिषद संपल्यानंतर कैलास चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रतिमेला कार्यालयाबाहेर जोडे हाणून निषेध नोंदविला. तसेच पडळकर यांच्या प्रतिमेचे बॅनर कार्यालयाच्या पायऱ्यांखाली ठेवत त्याचा पायतान म्हणूनही वापर केला.
सत्ताधारी भाजपने धुळ्याची वाट लावली आहे. मुळात धुळ्यात नगरसेवक हा शब्दच अस्तित्वात नाही. नगरसेवकांनी जनतेच्या भावनांचा चेंदामेंदा केला आहे. त्यामुळे जुने नगरसेवक निवडून येणारच नाहीत, असा दावा करतानाच महापालिका निवडणुका स्वबळावर लढवून सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देवू , राष्ट्रवादी सत्तेत आल्यास दररोज दोन तास पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी दिली.
शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहरातील झाशी राणी चौकात सुरू केलेल्या पक्षाच्या नव्या कार्यालयात कैलास चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कैलास चौधरी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने पक्ष पोरका झाला होता. अशा परिस्थितीत इर्शाद जहागिरदार यांची एन्ट्री झाली. त्यांनी पक्षाला उभारी देण्याचे काम केले. कैलास चौधरींवर आधीच अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका इर्शादभाईंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली. अजितदादांनी सकारात्मक भूमिका घेत माझ्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय कोणाच्या ताब्यात या भानगडीत आम्ही पडणार नाही. काम करण्यावर आमचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यातील राष्ट्रवादीचे 80 पदाधिकारी अजित दादांच्या गटात आहेत. हीच स्थिती राज्यभर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडेच येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष नेतृत्वाने आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता असताना धुळ्यात कुठलेही काम झालेले नाही. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. धुळेकरांना पाणी मिळत नाही. याआधी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना जनभावना डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने महापालिकेचा कारभार हाकला होता. राष्ट्रवादीने चांगले काम केले होते. राष्ट्रवादी मनपाच्या सत्तेत दोन तीन दिवसाआड पाणी मिळत होते. आता महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी सत्तेत आल्यास दररोज दोन तास पाणी जनतेला देवू. राज्य पातळीवर युती असली तरी स्थानिक पातळीवर आम्हाला पक्षाने भूमिका घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आम्ही महापालिका निवडणूक स्वबळावर लढवू आणि जिंकू देखील, असा विश्वास कैलास चौधरी यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला कैलास चौधरी यांच्यासोबत कुणाल पवार , सुरेश अहिरे, राजेंद्र चितोडकर , एजाज शेख, दानिश पिंजारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा