शिनकर पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूत, दसऱ्यापासून कर्जवाटप
धुळे : येथील दादासाहेब वामन विष्णू शिनकर पंतसंस्था पुन्हा एकदा नव्या दमाने सक्षमपणे कार्यरत झाली आहे. पंतसंस्था ड वर्गातून क वर्गात गेली आहे. यांचा मनस्वी आनंद वाटतो. पतसंस्थेची परिस्थिती अतिशय उत्तम आहे आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पतसंस्था कर्ज वाटप सुरू करणार आहे, अशी घोषणा पतसंस्थेचे चेअरमन उदय शिनकर यांनी शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
शिनकर पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन उदय शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सर्व संचालक, सभासद, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी उदय शिनकर म्हणाले, दादासाहेब वामन विष्णू शिनकर पंतसंस्थेची स्थापना ३३ वर्षांपूर्वी या शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी करण्यात आली. ज्यावेळी राष्ट्रीयीकृत बँका सहज कर्ज देत नव्हत्या आणि अटी शर्ती टाकत होत्या, त्या काळात शिनकर पतसंस्थेच्या माध्यमातून असंख्य नागरिकांना शिनकर आप्पांनी कर्ज वितरित करून व्याज बट्ट्याच्या चक्रातून सोडविले. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळींनी पतसंस्थेची बदनामी केली. अडचणी निर्माण केल्या. जिल्ह्यात तसेच राज्यभरात पतसंस्थांना मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. त्यातही शिनकर पतसंस्था सक्षमपणे टिकली. चढ उतार सुरू असतात. मात्र आज पतसंस्थेची परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आजही कोणत्याही ठेवीदाराने ठेव परत मागितल्यास त्याच दिवशी ठेव परत करू शकतो. येत्या काही दिवसात पतसंस्था मोठी भरारी घेईल.
जिल्हा बँकेत आणि देना बँकेत पतसंस्थेच्या मोठ्या रकमा आजही सुरक्षित आहेत. तसेच साडेतीन कोटी रुपयांच्या मालमत्ता पतसंस्थेच्या आहेत. नव्या दमाने प्रगती करून पुन्हा एकदा सक्षमपणे शिनकर पतसंस्था कार्यरत झाली आहे, असा विश्वास उदय शिनकर यांनी व्यक्त केला. तसेच दसऱ्यापासून कर्ज वाटप सुरू करणार आहे, अशी घोषणाही केली.
चेअरमन उदय शिनकर यांच्या घोषणेवर सर्व सभासद आणि संचालकांनी आनंद व्यक्त केला. सभेत ज्येष्ठ संचालकांनी देखील मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. विविध सभासदांनी प्रतिक्रिया दिल्या. सभेचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे मॅनेजर अजित राजपूत यांनी केले. यावेळी व्हा. चेअरमन कपूरचंद लक्ष्मण बाविस्कर, सतीष बहाळकर, जयप्रकाश महाले, सुरेश काळे, नरेंद्र पिंगळे, अलका अमृतकर, सुभाष वाणी, विजय नेरकर, अरुण वाणी, प्रवीण मिस्तरी, नरेंद्र येवले, शिवदास पाटील, दिनेश कोठावदे, राजहंस कुंभारे, भारत विभूते, दिगंबर सोनने, मधुकर येवले आदी उपस्थित होते.