जवाहर सूतगिरणीची नव्हे पुण्याच्या खासगी कंपनीची चौकशी? नवीन माहिती आली समोर
धुळे : काँग्रेस पक्षाचे राज्याचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या चौकशी संदर्भात तपास यंत्रणा किंवा सुतगिरणी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना मिळत नसल्याने अफवा, तर्कवितर्क आणि चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, जवाहर सूतगिरणीची नव्हे तर पुण्याच्या एका खासगी कंपनीची चौकशी आयकर विभागाकडून केली जात असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या कंपनीचे जवाहर सूतगिरणीशी व्यवहार होते, असे अनधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. सदर सूतगिरणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुणे येथील एका खाजगी कंपनीला चालविण्यासाठी दिली होती. या कंपनीची चौकशी आयकर विभागाने सुरू केली आहे. कंपनीच्या व्यवहारासंदर्भातली अधिक चौकशी आणि कागदपत्रांची तसेच व्यवहाराची पडताळणी करण्याकरिता आयकर विभागाची पथके तीन दिवस जवाहर सूतगिरणीत तळ ठोकून आहेत, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमदार कुणाल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?: काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपास यंत्रणांनी शनिवारी पहाटे छापेमारी केली. तेव्हापासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पहिले दोन दिवस तर तपास यंत्रणा नेमकी कोणती आहे हेच कळले नाही. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र पुणे आयकर विभागाचे पथक चौकशीसाठी आल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले.
कारवाईबद्दल कमालीची गुप्तता: या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सूतगिरणी व्यवस्थापनाच्या भ्रमणध्वनींसह इतर संपर्क यंत्रणा खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच तपास पथकाने हा परिसर पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला आहे. शनिवारी पहाटे पोलीस कुमकसह धडकलेल्या ताफ्याने सूतगिरणीत खळबळ उडाली. पथकातील काही अधिकाऱ्यांनी सूतगिरणीच्या व्यवस्थापकांच्या निवासस्थानीही तपासणी केल्याचे म्हटले जात आहे.
जवाहर सुतगिरणी भाडेतत्वाने दिली?: आमदार कुणाल पाटील यांच्याकडे नऊ वर्षांपासून सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. धुळे शहरालगत मोराणे शिवारात ही सूतगिरणी आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार पुण्याच्या खासगी कंपनीची चौकशी आयकर विभागाकडून केली जात आहे, कारण जवाहर सूतगिरणी या कंपनीला भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी दिली होती. परंतु एखादी सहकारी संस्था खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देता येत नाहीत, असे जाणकारांचे मत आहे.
भाजपचे दबावतंत्र तर नाही ना?: केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करुन भाजपकडून ईडीसह इतर यंत्रणांचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कायमच करण्यात येतो. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून याआधी त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात येते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकांच्या काळात धुळे जिल्ह्यात झालेल्या छापेमारीनंतर माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते या दिग्गज नेत्यांनी काॅंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी माजी मंत्री रोहिदास पाटील आणि त्यांचे सुपुत्र आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात छापे टाकले होते असेही म्हटले जाते. परंतु त्यांनी पक्ष सोडला नाही. निवडणुका जवळ आल्याने पुन्हा तसा प्रयत्न तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कुणाल पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी : काॅंग्रेस पक्षाने कुणाल पाटील यांच्याकडे नुकतीच विदर्भातील अमरावती आणि नागपूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडून आलेले कुणाल पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना गळाला लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आमदार कुणाल पाटील यांची प्रतिक्रिया?: सूतगिरणीवर कोणत्या संस्थेने छापा टाकला, याची माहिती नाही. संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली असून या संदर्भात आपणास या क्षणापर्यंत काहीही कल्पना नाही. गिरणीचे लेखापरीक्षण झाले असून, त्यात कुठलाही दोष आढळून आलेला नाही. या छाप्यामागे राजकीय हेतू असेल असा दावा आपण ठोस काही कळल्याशिवाय करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी पहिल्या दिवशी प्रसारमाध्यमांना दिल्याची चर्चा आहे.