धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेना!
धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी मयत कर्मचाऱ्याच्या मुलाने महात्मा गांधी जयंती दिनी आमरण उपोषण सुरू केले. शहरातील क्युमाईन क्लबजवळ तो उपोषणाला बसला असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिपाई विजय संभाजी अहिरे (रा. मनोहर टॉकीज मागे आंबेडकर चौक धुळे) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा हर्षद विजय अहिरे यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था धुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे यांच्याकडे केली आहे. हर्षद विजय अहिरे यांचे वडील मयत विजय संभाजी अहिरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामस्वरूपी शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. घरातील एकमेव आर्थिक भार उचलणारी व्यक्ती गमावल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची व बिकट आहे. घरात आजी, विधवा आई, बहिण, दोन भाऊ असा एकूण पाच लोकांचा परिवार आहे. त्यामुळे कुटुंबातील वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता असलेली सर्व पुरावे आहेत. या मागासवर्गीय जातीचा असून, १२ वी उत्तीर्ण आहे. संगणक विषयाची (एम. एस. सी. आय. टी.) परीक्षा उत्तीर्ण आहे. परंतु उत्पन्नाचे कोणतेही साधन मागील तीन वर्षापासून माझ्याकडे नाही. बऱ्याच वेळा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था धुळे व बाजार समिती सभापती यांना लेखी, समक्ष मौखिक भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु मला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनुकंपावर सामावून घेण्याबाबत कोणीही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे मानसिक स्थिती बिघडवून गेली आहे. या विमनस्क अवस्थेत माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तीन वर्षे बाजार समितीत सतत पायपीट करून मला न्याय देण्यात येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.