कंत्राटी नोकर भरती निर्णयाविरोधात शिक्षकांचा राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा
धुळे : कंत्राटी नोकर भरती आणि सरकारी शाळा काॅर्पोरेट कंपन्यांना देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील शिक्षकांनी महात्मा गांधी जयंती दिनी भव्य आक्रोश महामोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले. धुळ्यातील मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
धुळे जिल्हा शिक्षक समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यव्यापी आंदोलन झाले. प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी वेगवेगळी अशैक्षणिक कामे, अनेक प्रकारच्या ऑनलाइन माहिती, वेगवेगळे मोबाईल ॲप तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार अवमानकारक वागणूक व वक्तव्य, शाळा कार्पोरेट कंपन्यांना चालविण्यास देणे, बाह्य यंत्रणेद्वारे करण्यात येणारी भरती व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. त्यांना शिकवून त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्या. इतर सर्व कामे बंद करून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
प्रमुख मागण्या अशा : सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे, ऑनलाइन माहिती, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप बंद करून शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम द्यावे, कार्पोरेट कंपन्यांना सरकारी शाळा चालविण्यास देण्याचा निर्णय मागे घ्यावा, बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी नेमण्याबाबतचा दिनांक ६ सप्टेंबर २०२३ चा जी.आर. रद्द करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांबद्दल अवामानकारक वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, सन २०१६ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा लाभ मिळणाऱ्या राज्यातील ३० ते ४० हजार शिक्षकांवर ७ व्या नेतन आयोगात अन्याय झाला असून, शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करावी, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, नवीन शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी, दहा, वीस आणि ३० अशाश्वित योजना लागू करावी, सर्व थकित बिलांचे अनुदान त्वरित मिळावे, शाळा सुसज्ज व भौतिक सुविधायुक्त असाव्यात, एमएससीआयटी अट रद्द करावी, संच मान्यता त्रुटी दूर कराव्यात, बदली प्रक्रियेतील त्रुटी बाबत न्याय मिळावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी राजेंद्र नांद्रे, रुपेश जैन, राजेंद्र पाटील, बापू पारधी, संजय पोतदार, गमन पाटील, शरद पाटील, मनोहर शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते.