मुद्रांक विक्री बँकेतून केल्यास आझाद मैदानावर आंदोलन
धुळे : मुद्रांक विक्रीचे अधिकार बँकांना दिल्यास राज्यातील मुद्रांक विक्रेते देशोधडीला लागतील. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यास मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघातर्फे मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभाग १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक (स्टॅम्प पेपर) आता व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय घेत असून, ही प्रक्रिया बँकेतून (फ्रेंकिंग करून स्टॅम विक्री) करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयास शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघाने विरोध दर्शविला आहे. मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप देवरे यांच्यासह शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेते हे आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कोणतीही तक्रार नाही. महाराष्ट्रात गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात सुद्धा एकही मुद्रांक विक्रेत्याचा सहभाग नव्हता. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजाराच्या आसपास मुद्रांक विक्रेते आहेत. त्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. मुद्रांक विक्री बँकांना देऊन महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेत्यांना देशोधडीला लावण्याचे काम शासनाने करू नये. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील. मंत्रिमंडळाने असा कुठलाही प्रस्ताव मंजूर करू नये. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते त्यांच्या कुटुंबासहित आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष आर. आर. पाटील, नासिर पठाण, माधवराव पाटील, पंढरीनाथ सोनवणे, दिनेश शुक्ल, अशोक धात्रक, संजय गोसावी, इस्माईल पिंजारी, रवींद्र विधाते, सुनील ठाणगे, दीपक गोराणे, अविनाश शेलार, विजय पाटोळे, अशोक पाटील, प्रकाश महाले, अमोल माळी, प्रवीण चव्हाण, अशोक चौधरी, धनंजय गिरासे, आर. पी. माळी, अनिल अग्रवाल, दयानंद भट, बापू बागुल, भटू खैरनार, पंकज चौधरी, प्रवीण जगताप, उत्तमराव पाटील, प्रकाश खैरना, पुंडलिक सोनवणे, सुनील वानखेडे, गणेश माळी, नामदेव गोसावी, एस. ए. कुळकर्णी, रमेश पाटील, रविराज जोशी, सोपान चौधरी, एन. सी. गिरासे यांच्या सह्या आहेत.