शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार आज लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय तेजस गर्गे हे यावेळी उपस्थित होते.
ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील.ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्व शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा आजचा हा क्षण ऐतिहासिक आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनाचा सोहळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला. याच वर्षात आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग आहे. शिवकालीन हत्यारांमध्ये वाघनखांना मोठं महत्त्व होतं, असे त्यांनी सांगितले.
शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्य विभागानं हा आगळा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक विभागातील त्यांचे सहकारी कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले. या करारासाठी राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, केंद्र सरकार आणि ब्रिटीश सरकार यांचे अभिनंदन, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी असलेला राजा भारतात दुसरा झाला नाही. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे. शिवप्रतापाचं स्मरण करून देणारं ते निमित्त ठरेल. या शिवप्रतापाची प्रेरणा घेऊनच आपली पुढची पिढी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लंडन येथे आज ढोल आणि ताशांच्या निनादात आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ या जयघोषात अतिशय स्फूर्तिदायक वातावरणात आज या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी या संग्रहालयातील ऐतिहासिक ठेवा मंत्री श्री. मुनगंटीवार, मंत्री श्री. सामंत आणि उपस्थितांनी पाहिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर राज्य शासनाच्या वतीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यास खऱ्या अर्थाने आज यश आले.