राहुल गांधींना रावणाची उपमा देणाऱ्या भाजपच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जोरदार घोषणाबाजी
धुळे : सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपने नैराश्यातून काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा फोटो रावणाच्या रूपात सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे. राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भाजपाच्या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धुळ्यात घोषणाबाजी करीत जोरदार निदर्शने केली.
काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनाच्या आवारात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी सांगितले की, सन २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडविण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असून ते आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काम करीत आहेत. देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा काम करीत आहे. हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पण राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ‘भारत जोडो’ यात्रा काढून देश आणि जनता जोडण्याचे काम केले आहे. भाजपच्या भ्रष्ट कारभाराची चीरफाड केली. त्यामुळे हताश झालेल्या भाजपने राहुल गांधींना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून खासदारकी रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केली. रावणाच्या वृत्तीच्या मोदी सरकारला प्रभू श्रीरामाप्रमाणे वागणारे सत्यवचनी राहुल गांधी पुरून उरले आहेत. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या भाजपने राहुल गांधींचा फोटो रावणाच्या रूपात एडिट केला आणि सोशल मीडियावर प्रसारित करून पुन्हा एकदा देशाला रावण राजची आठवण करून दिली. रावणाने ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाला त्रास दिला त्याचप्रमाणे भाजप देखील राहुल गांधींची बदनामी करत त्रास देत आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या रावणरुपी भाजपचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे अध्यक्ष शामकांत सनेर यांनी सांगितले.
या आंदोलनात काँग्रेसचे धुळे जिल्हा शहर निरीक्षक हेमंत ओगले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल भामरे, काँग्रेसचे धुळे तालुका अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, आसिफ खान, मोहन पाटील, पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक एन. डी. पाटील, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, जि. प. सदस्य प्रवीण चौरे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष हसन पठाण, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, पं. स. सदस्य राजेंद्र देवरे, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष डॉ. विलास बिरारी, सेवा दलाचे अध्यक्ष आलोक रघुवंशी, दीपक गवळे, डॉ. दत्ता परदेशी, काँग्रेस उपाध्यक्ष के. डी. पाटील, ब्लॉक अध्यक्ष इम्तियाज पठाण, शिवाजी अहिरे, फैसल अन्सारी, पप्पू सहानी, आयुब खाटीक, दीपक पाटील, राजीव पाटील, भटू चौधरी, राजेंद्र खैरनार, पं. स. सदस्य सुरेखा बडगुजर, महिला काँग्रेसच्या अर्चना पाटील, बानु शिरसाठ, माधुरी निकम, ज्योती इंगळे, छाया पाटील, सरपंच सोनी भिल, राजेंद्र देवरे, कैलास पाटील, किरण नगराळे, सुनिता मांडगे, नरेंद्र पाटील, साक्री येथील विश्वास बागुल, सागर देसले, संदीप पाटील, निंबा भोये आदी सहभागी झाले होते.