शालिनीताई भदाणेंच्या प्रयत्नांना यश, दोंदवाडच्या चिमुकल्यांना मिळाले हक्काचे गुरुजी
धुळे : दोंदवाड (ता. धुळे) येथील जिल्हा परीषद शाळेत एक शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी तात्काळ एका शिक्षकाची नेमणूक करा, अशी मागणी, जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी सीईओ शुभम गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी (दि.६) प्रत्यक्ष भेटून केली होती. दरम्यान, ११ रोजी ग्रामस्थ व पदाधिकारींनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेत आपले गार्हाणे मांडले. ग्रामस्थांची अन् चिमुकल्यांची मागणी व शालिनीताई भदाणे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत दोंदवाड शाळेवर शिक्षकाची तत्काळ नेमणूक करण्यात आली. चिमुकल्यांना आपले हक्काचे गुरुजी मिळाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
संजय पोपट पाटील हे प्राथमिक शिक्षक दोंदवाड शाळेवर रुजू झाले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, जि. प. चे शिक्षण सभापती महाविरसिंग रावल, माजी कृषी सभापती संग्राम पाटील, दोंदवाड उपसरपंच गंगुबाई माळी, ग्रा. पं. सदस्य रवींद्र बिऱ्हाडे, विक्रम माळी, संजय बनसोडे, धर्मा माळी, कैलास माळी, हेमंत जाधव, बापू बोरसे, अनिल माळी, देविदास शार्दूल, किरण पाटील, बापू माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बोरकुंड जि. प. गटातील दोंदवाड येथील जि. प. मराठी शाळेत ७२ विद्यार्थी संख्या आहे. परंतू येथे सध्या फक्त २ शिक्षक कार्यरत होते. या ठिकाणी शिक्षक संख्या तीन आवश्यक असल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रती नियुक्तीवर गेलेल्या शिक्षकाच्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी दि. ६ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता याची भेट घेत केली होती.
तसेच यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरकुंड येथे दररोज १०० ते १२० रुग्णांची ओपीडी होत असते. परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता व काही औषधांचा नेहमीचा तुटवडा लक्षात घेता रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे संबंधित अधिकार्यांना सूचना करून समस्या निकाली काढाव्यात. मौजे रतनपुरा येथे जि. प. मराठी शाळेत पटसंख्येअभावी कमी केलेल्या एका शिक्षकांची प्रती नियुक्ती करावी, अशी मागणीही जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी केली होती.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दरम्यान, ग्रामस्थ व पदाधिकारींनी विद्यार्थ्यांना घेऊन जि. प. गाठले होते. यावेळी ग्रामस्थांनीही आपले याबाबत गार्हाणे मांडले होते. ग्रामस्थ, चिमुकले बालक व शालिनीताई भदाणे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत दोंदवाड जि. प. शाळेवर शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. धुळे
तालुक्यातील शिक्षणाचा प्रश्न सोडविणार !
बोरीपट्टयासह धुळे तालुक्यातील ज्या-ज्या मराठी शाळांवर शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या-त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाहीत. यासाठी आवश्यक पाठपुरावा पुढच्या काळात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू.
– शालिनीताई बाळासाहेब भदाणे, जि. प. सदस्या, बोरकुंड गट
हेही वाचा