पिंपळनेर वनक्षेत्रातील वृक्षतोड, वन जमीन अतिक्रमणाची चौकशी
धुळे : पिंपळनेर वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड करून वन जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती धुळे वन विभागाचे उप वनसंरक्षक नितीन कुमार सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
पिंपळनेर वनक्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड करून वन जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार पाच गावांमधील सरपंच आणि ग्रामस्थांनी सोमवारी धुळे वन विभागाला दिली. याबाबत वनपाल संदीप मंडलिक यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नवेनगरचे सरपंच भोये, मल्याचापाडा गावाचे सरपंच शशिकांत चौधरी, उपसरपंच शांताराम बोरसे, बळीराम भोये, रवी मालुसरे, वसंत मालुसरे, कैलास मोरे यांच्यासह पाच गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी धुळे येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर वनक्षेत्रात संदीप मंडलिक हे वनपाल पदावर कार्यरत आहेत. परंतु ते त्यांच्या कार्यक्षेत्रात संरक्षणार्थ गस्त करीत नाहीत. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच, वनसंरक्षण समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष यांच्याशी संपर्कात राहत नाहीत. वनविभागाच्या जनतेचा सहभाग घेत नाहीत. वनविभागाच्या विविध योजना, कार्यक्रम, उत्सव, जागतिक वन दिन, जागतिक पर्यावरण दिन, वसुंधरा दिन याबाबत सहभाग घेऊन जनजागृतीचे काम, प्रबोधनात्मक कार्य करीत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
मल्याचापाडा कंपार्टमेंट क्रमांक 377, 378, 379 यात अनुक्रमे 25 हेक्टर क्षेत्रावर 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रोपवने घेण्यात आलेली आहेत. रोपवनावर रोपवनपूर्व लागवड खर्च, संरक्षण खर्च, निंदणी, औषधे, खते इत्यादी लाखो रुपयांचा खर्च शासनाने केला आहे. या रोपवनातील मौल्यवान दुर्मिळ वनस्पती, झाडोरा, विविध प्रकारची झाडे व उमद्या रोपांची कत्तल करून तेथे प्रचंड मोठ्या क्षेत्रावर नांगरटी, वखरटी करून, पीक पेरा करून अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे. या सर्व कृत्यांना वनपाल संदीप मंडलिक हेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी अवैध वृक्षतोड, रोपवन नुकसान तात्काळ नियंत्रणात आणणे आवश्यक होते. ते त्यांचे शासकीय कर्तव्य होते. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवले नाही आणि शासनाचा लाखो रुपये खर्च करून जगविलेल्या रोपवनातील उमद्या रोपांची नासधूस करण्यास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
वनपाल संदीप मंडलिक यांना ग्रामसभेचा अजेंडा देऊन देखील ते ग्रामसेवक ग्रामसभेत उपस्थित राहिले नाही व त्यांचा प्रतिनिधी देखील हजर नव्हता याबाबत त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवावा. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णयिमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व दफ्तर, बँक पासबुक बाबतची संपूर्ण कागदपत्रे पूर्णवेळ ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्याचे आदेश आहेत. या नियमांचे वैयक्तिक फायद्यासाठी ही कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात न ठेवता ती स्वतःच्या ताब्यात ठेवली आहेत. हे दप्तर आजपर्यंत ग्रामस्थांना दाखविले नाही. वरील शासन निर्णयानुसार संदीप मंडलिक यांच्यावर कारवाई करण्यात यावी. वनपाल संदीप मंडलिक पिंपळनेर मुख्यालय येथे आठवड्यातून केवळ दोनच दिवस उपस्थित असतात. परंतु ते ग्रामस्थांना तसेच सरपंच, पोलीस पाटील, जीएफएम समिती सदस्यांना भेटत नाहीत. त्यांना या मुख्यालयात वास्तव्याचे आदेश द्यावेत. मल्याचापाडा, भाईदर, नवापाडा, पिंपळनेर गावाच्या वनहद्द संरक्षणार्थ निश्चित करून द्यावे म्हणजे आम्ही आमच्या आधीचे संरक्षण स्वतः करणार आहोत.
मल्याचापाडा कंपार्टमेंट क्रमांक ३७७, ३७८, ३७९ यातील 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत 2019 यातील अनुक्रमे क्षेत्र पंचवीस हेक्टर वरील वृक्षतोड रोपण नुकसानी वनपाल मंडलिक सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याकडून रोप वनावरील झालेला खर्च शासकीय जंगल संपत्तीची एकरकमी व्याजासह वसूली करावी. वनपाल संदीप मंडलिक यांनी शासकीय कामात अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि अकार्यक्षमपणे शासकीय सेवेत कुचराई केल्याबाबत त्यांच्यावर शिस्त व अपील 1979 च्या नियमान्वये निलंबन करून खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करावी. अन्यथा याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.
पिंपळनेर वनक्षेत्रातील काही गावांमधील ग्रामस्थांनी वृक्षतोडीबाबत तसेच वनपाल मंडलिक यांच्याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने त्वरित चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– नितीन कुमार सिंग, उपवनसंरक्षक धुळे वन विभाग