फटाके विक्रेत्यांनी कायदेशीर अटी-शर्तींचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार : जिल्ह्यात १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दिपावली सणासाठी कायद्यातील काही अटी व शर्तींनुसार तात्पुरता फटाके परवाना दिला जाणार आहे, जिल्ह्यातील सर्व फटाके विक्री, साठवणुक करणाऱ्या विक्रेत्यांनी या कायदेशीर अटी, शर्तींचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
या संदर्भात श्रीमती खत्री यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत या अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. विस्फोटक नियम, २००८ चे नियम ८४ नुसार मुख्य विस्फोटक नियंत्रण (पश्चिम मुंबई) यांच्याकडून अटी,शर्तींचे निर्देश जिल्हा प्रशानसास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, फटाके विक्री, ठेवणेकामी प्रत्येक बुथ व स्टॉल साठी दिला जाणारा परवाना दारु अथवा फटाके साठी १०० कि.ग्रॅ. तसेच शोभेच्या झकाकणाऱ्या फटाक्यांसाठी ५०० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त बाळगता येणार नाहीत. प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील शिफारस केलेले तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉल्सची संख्या एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉल मधील अंतर तीन मीटर पेक्षा कमी नसावे. तसेच बाहेरील सुरक्षित अंतर ५० मीटर असल्यास दोन स्टॉल मधील अंतर तीन मीटर पेक्षा कमी नसावे. तसेच बाहेरील सुरक्षीत अंतर ५० मीटर पर्यतचे व असे स्टॉल्स दोन किंवा दोनपेक्षा अधिक रांगेत असल्यास ती समोरासमोर ५० मीटर पेक्षा कमी अंतराची नसावीत. प्रत्येक स्टॉलमधील वरील फटाक्याची एकुण परिमाणता ५०० कि. ग्रा. पेक्षा अधिक नसावी. प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र १०-२० चौ.मी.पर्यंतचे असावे. एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगामधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत व ते मागील बाजुने बंद असावे. फटका विक्री स्टॉल मध्ये अग्नि उपद्रवास कारणीभुत ठरणाऱ्या वस्तू व बाबी प्रतिबंधीत असतील.
फटाक्यांच्या स्टॉल्सच्या परिसरात धुम्रपान प्रतिबंधीत असेल. तेथे अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात असावी. अनपेक्षीत घटना घडु नये म्हणुन फटाका विक्री स्टॉलच्या ठिकाणी व परिसरात दक्षता पथकाची गस्ती असावी. आपटुन फुटणाऱ्या फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासुन ४ मीटर अंतरापर्यत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर साखळी फटाक्यांत एकुण ५० व ५० ते १०० व १०० वरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत ११५, ११० व १०५ डेसीबल एवढी असावी. गाडीतून किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्रीस मज्जाव असेल. ज्या फटाक्यांमुळे रहीवास किंवा जवळच्या परिसरातील प्रवासी, पादचारी यांना अडथळा, गैरसोय, जोखीम, त्रास, नुकसान होण्याचा संभव निर्माण होईल असे फटाके जवळ बाळगण्यास, विक्री करण्यास, सोडणे अगर फेकण्यास मनाई करण्यात येत आहे.
रात्री १० ते सकाळी ०६ या वेळेत फटाक्यांच्या वापर करता येणार नाही. शांतता झोनमधील रुग्णालये, शौक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक, प्रार्थना स्थळे यांच्या सभोवतालचे १०० मीटर पर्यंतच्या क्षेत्रात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करता येणार नाही. केवळ परवाना धारकांनाच फटाके विक्री करता येईल. परवाना मिळाल्या खेरीज कोणीही फटाके विक्री करणार नाही व मंजुरी दिलेल्या जागेवरच फटाके विक्री वैध राहील. परवान्याशिवाय फटाके विक्री व बाळगल्याचे आढळुन आल्यास संबधीत व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
परवान्यासाठी अर्ज करताना…
फटाके विक्री व साठवणुक परवान्यासाठी मागणी अर्ज विहीत नमुन्यात असावा. हे अर्ज १५ ऑक्टोबर पर्यंत वितरीत केले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत राहील. पोलीस प्रशासनाने प्राप्त अर्जांवर अभिप्राय कळविण्याची अंतिम मुदत दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असेल. पोलीस प्रशासनाकडील शिफारशीअंती मंजुर परवाने २५ ते ते ३१ ऑक्टोबर २०२३ वितरीत केले जातील. फटाके विक्री परवाना हा विक्रीच्या ठिकाणी दर्शनी भागावर प्रदर्शित करणे अनिवार्य राहील. अर्जदारांनी त्यांचे स्वतःचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो अर्जासोबत जोडावेत. विस्फोटक नियम, २००८ आणि १८८४ तसेच शासन, प्रशासनाने वेळो-वेळी जारी केलेल्या अटी व शर्तींचे परवानाधारकाने काटेकोर पालन करावे. वरील निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील. ही अधिसुचना संपुर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी ३१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत लागू राहील, असेही या अधिसूचनेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नमूद केले आहे.