शुभम साळुंखे खून प्रकरणातील सहा संशयितांना अटक
धुळे : शहरातील नवनाथ नगरमधील शुभम साळुंखे खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी लावला असून, सहा हल्लेखोराना अटक केली आहे. ज्याचा खून झाला तो शुभम साळुंखे आणि त्याचा खून करणारे मारेकरी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. तसेच शुभम साळुंखेचा खून टोळी युद्धातून झाल्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
मारेकऱ्यांविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे : पोलिसांनी अटक केलेल्या महेश उर्फ घनश्याम प्रकाश पवार याच्याविरुद्ध सर्वाधिक १५ गुन्हे दाखल आहेत. अक्षय श्रावण साळवे याच्याविरुद्ध नऊ, गणेश साहेबराव माळी याच्याविरुद्ध दोन, जगदीश रघुनाथ चौधरी याच्याविरुद्ध चार, तर जयेश रवींद्र खरात उर्फ जीभ्या याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुभम साळुंखे आणि मारेकरी यांच्यात दुश्मनी होती. पूर्ववैमानस्यातूनच त्याच्या घरावर दगडफेक झाली आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शुभम साळुंखे खून प्रकरण : शुभमचा भाऊ विनायक जगन साळुंखे (रा. नवनाथनगर, धुळे) याने ८ ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांत फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार, घनश्याम उर्फ महेश पवार याने घरावर दगडफेक केली होती. याचा जाब शुभम जगन साळुंखे (रा. नवनाथनगर) याने विचारल्याने महेश पवार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने शुभम यास जबर मारहाण केली. शहरातील गांधी पुतळ्याजवळ झालेल्या मारहाणीनंतर त्याचे अपहरण करण्यात आले. मोटासायकलवर बसवून वरखेडी रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोकडे नेण्यात आले. त्याठिकाणीही कोयत्यासारख्या धारदार शस्त्रासह लोखंडी रॉड व फाईटने शुभम साळुंखे याच्यावर हल्ला चढविण्यात आला. जखमी अवस्थेत त्याला कचरा डेपो परिसरात फेकून दिले होते. पोलिसांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या फिर्यादीवरून पोलिसांनी आझादनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुध्य खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांचा वेगवान तपास : या खून प्रकरणी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास तात्काळ लावला. विनायक साळुंखे यांनी फिर्यादीतून दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गणेश अनिल पाटील यास पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती भागातून ताब्यात घेतले. यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश उर्फ घनश्याम प्रकाश पवार (वय ३२, रा. स्वामीनारायण कॉलनी), गणेश साहेबराव माळी (वय २०, रा. पन्नास खोली शांती नगर, धुळे) आणि जगदीश रघुनाथ चौधरी (वय १८, रा. स्वामीनारायण कॉलनी, मार्केट यार्ड, धुळे याच्या शोधार्थ पथक तैनात करण्यात आले. हे संशयित नाशिक येथून संगमनेरमार्गे पुण्याकडे पसार झाल्याची तात्रिंक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुणे येथे रवाना करण्यात आले होते. या पथकाने दिघी येथील मॅकझिन चौकात मोटारसायकलसह उभ्या असलेल्या तीघांना पाहिले. पोलीस आल्याची चाहूल लागताच तिघांनीही मोटर सायकल सोडून पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडले.
या गुन्ह्यातील फरार संशयीत अक्षय श्रावण साळवे आणि जयेश वीरेंद्र खरात उर्फ जिभ्या हे राजस्थान येथे पसार झाल्याचे तांत्रिक विश्लेषणावरून कळाल्यानंतर पोलिसांनी राजस्थान येथेही पथक रवाना केले होते. संशयितांनी अजमेरहून इंदूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसमध्ये प्रवेश करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी रतलाम येथे सापळा रचून लक्झरी बसेसची तपासणी सुरू केली. पैकी एका बसमध्ये अक्षय साळवे व जयेश खरात हे सापडले. त्यांना पथकाने ताब्यात घेतले आहे.
पथकामध्ये यांचा समावेश : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी या खुनाच्या तपासासाठी तयार केलेल्या पथकामध्ये बाळासाहेब सूर्यवशी, अमरजित मोरे, संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, रविकिरण राठोड, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, सुशील शेंडे, शशिंकात देवरे, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, योगेश साळवे व अमोल जाधव यांचा समावेश होता.
शुभम साळुंखेचे मारेकरी अट्टल गुन्हेगार : महेश पवार, अक्षय साळवे, गणेश माळी, जगदीश चौधरी, व जयेश खरात यांच्या विरुध्य विविध पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी दंगा करणे व अवैध शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.
Comments 3