धुळे शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते संग्राम लिमये यांना गोवा येथे झालेल्या ट्रायथेलाॅन स्पर्धेत नुकताच मानाचा ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळाला. आयर्न मॅन टायटल मिळवण्यासाठी अथक परिश्रमांची पराकाष्टा करावी लागते. सरावाला सुरुवात केल्यापासून ते हा किताब मिळवण्यापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास त्यांच्याच शब्दात…
कॉमन मॅन ते आयर्न मॅन… संग्राम लिमये
साधारण तीन वर्षांपूर्वी आमच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस होता. त्यावेळी बायकोने इच्छा व्यक्त केली की, यावर्षी आपण 14 किलोमीटर पळून लग्नाचा वाढदिवस साजरा करूया. सुरुवातीला ही कल्पना मला फारशी आवडली नाही. पण बायको फार कधी काही मागत नाही आणि तिची इच्छा असेल तर तिच्या इच्छेला मान द्यावा असा विचार मी केला. थोडाफार सराव करून, चालून, पळून फारशी इच्छा नसताना त्यावर्षी चौदा किलोमीटर अंतर आम्ही दोघांनी कसेबसे पूर्ण केले. त्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह दोन्हीही वाढले. त्याचा परिणाम असा झाला की, लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसाला आम्ही हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर अंतर पळून पूर्ण केले.
या दरम्यान धावण्याचा स्पीड वाढावा व सुधारणा व्हावी यासाठी मी youtube वर वेगवेगळे व्हिडिओज बघायला सुरुवात केली. त्यामध्ये मला जीटीएन म्हणजे ग्लोबल ट्रायथेलॉन नेटवर्क नावाचा एक चॅनल दिसला. ज्यामध्ये रनिंग बरोबर सायकलिंग व स्विमिंग या तिन्ही प्रकारांसाठी लागणारे व्यायाम व स्वतःच्या शैलीत सुधारणा करण्यासाठीच्या टिप्स याचे वेगवेगळे व्हिडिओ मी बघायला लागलो. ट्रायथेलॉन या एका वेगळ्या खेळ प्रकाराची मला ओळख झाली. मॅरेथॉन म्हणजे पळणे, ड्युऐथलाॅन म्हणजे पळणे आणि सायकल चालवणे आणि ट्रायथेलॉन म्हणजे स्विमिंग सायकलिंग आणि शेवटी रनिंग.
जगभरामध्ये आयर्न मॅन या किताबासाठी ट्रायथेलॉनची एक रेस होते. ज्यामध्ये सुरुवातीला दोन किलोमीटर अंतर समुद्रामध्ये पोहायचे असते. त्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग करून शेवटच्या टप्प्यात 21 किलोमीटर पळायचे असते. हे सर्व सलग 8 तास 30 मिनिटांच्या आत संपवल्यास ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळतो. हे बघत असताना मनात कल्पना आली की, हे काहीतरी भन्नाट आणि वेगळं आहे. आपण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. घरात आई-बाबा सिद्धी, सानिका यांच्याबरोबर जेवताना सहज मी विषय काढला की, अशा प्रकारची स्पर्धा असते आणि त्यामध्ये भाग घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. सुरुवातीला त्यांना वाटले की मी असंच काहीतरी म्हणतो आहे. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आले की मी खरंच असं काहीतरी करायचं मनात पक्क केलेलं आहे.
सुरुवातीला त्यांनी मला वेड्यात काढले. हे शक्य नाही, एवढे अंतर करणं तुला जमणार नाही, आपल्या भागात असं कोणी केलेलं नाही, आपल्याकडे अशा कुठल्या अकॅडमीही नाहीत जिथे तुला अशा प्रकारचे ट्रेनिंग मिळेल. व्यवसाय, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधलं काम आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळून तू हे करू शकणार नाहीस. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवातीला त्यांनी मला यापासून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की मला खरंच या रेसमध्ये पार्टीसिपेट करायचे आहे. मग मात्र माझ्या पूर्ण कुटुंबाने आयर्न मॅन टायटल मिळेपर्यंत हर प्रकारे मला साथ दिली.
मला जेमतेम पोहोता येत होते. त्यामुळेच दोन किलोमीटर समुद्रामध्ये पोहणे ही त्यावेळेला अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती. सायकलिंगच्या बाबतीत तर सायकल विकत घेण्यापासून सुरुवात होती. रनिंग देखील अगदीच चालत पळत जेमतेम रोज पाच-सात किलोमीटर इथपर्यंतच माझी तयारी होती. पण हळूहळू हळूहळू मी याविषयी जेवढी माहिती मिळेल तेवढी इंटरनेटच्या माध्यमातून आणी लोकांना भेटून गोळा करायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की प्रकरण वाटतं तेवढं साधं, सोपं नाही. या रेसमध्ये डीहायड्रेशन होऊन काही लोक मेले देखील आहेत. व्यवस्थित आहार, विश्रांती व सराव याशिवाय रेसला जाणे म्हणजे जवळजवळ आत्महत्या करण्यासारखेच होतं. माझ्या बहिणीने देखील सुरुवातीला विरोधच केला. मग म्हणाली की, आधी सर्व मेडिकल टेस्ट करून घे आणी स्वतःची शारीरीक क्षमता तपास. आमच्या कुटुंबाचे सदस्य डॉ. मंदार म्हस्कर यांना या रेस बद्दल सांगितलं व विचारलं की तुम्हाला काय वाटते, मी मेडिकली फिट आहे का? आणि अशी रेस करू शकेन का? त्यांनी काही टेस्ट करून घेतल्या व त्यानंतर म्हणाले रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत. पण तरी खूप जास्त सराव करावा लागेल.
मग त्यानुसार तयारीला सुरुवात झाली. धुळ्यातले उत्तम सायकलिस्ट डॉ. सुनील नाईक यांच्या सल्ल्यानुसार मी सायकल विकत घेतली. सायकलिंग मधले बारकावे व क्लुप्त्या त्यांच्याकडून समजून घेऊन हळूहळू सायकलिंगचा सराव सुरू केला. स्विमिंग पूलमध्ये पोहणे आणि जलाशयात किंवा समुद्रात पोहणे अतिशय वेगळे असते. त्यामुळे धुळ्यामधले उत्तम स्विमर दिलीप खोंडे यांच्या मदतीने एमआयडीसीच्या जलाशयात काही वेळा व स्विमिंग टॅंकमध्ये दररोज अशाप्रकारे पोहायची देखील प्रॅक्टिस केली. रनिंगचा सराव सुरूच होता. या सर्व प्रवासामध्ये माझे जवळचे मित्र फिजिओथेरपिस्ट डॉ. मिलिंद निकम यांचे देखील नियमित मार्गदर्शन मला लाभत होते. एन्जुरी कशा टाळता येतील? मसल्स फ्रेंडली कसे होतील? याबाबतीत वेळोवेळी त्यांनी टिप्स दिल्या. आहार काय असावा व काय टाळावा? यासाठी डॉ. जितेश पाठक यांनी नियमितपणे आहार विहार याबाबतीत सल्ला दिला.
हार्ट रेट, झोपेची कॉलिटी, रनिंग- सायकलिंग यातील अंतर, यासाठी लागणारा वेळ हे सर्व मोजण्यासाठी जीपीएस असणारे घड्याळ खास जपानहुन माझी बहीण सायली व मेहुणे अमित यांनी पाठवले. त्याचप्रमाणे रेसमध्ये लागणाऱ्या एनर्जी जेल देखील त्यांनी मुद्दाम जपानहुन माझ्यासाठी पाठवल्या.
घरामध्ये आई, बाबा व सानिका यांनी माझ्या आहार प्रकारात मला हवे तसे सर्व बदल करून रोज प्रोटीनयुक्त व फायबरयुक्त जेवण माझ्यासाठी खास बनवायला सुरुवात केली. हळूहळू माझ्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा देखील बदलायला लागल्या. मी रात्री दहा वाजेच्या आत झोपायला लागलो आणि सकाळी पाच वाजेच्या आत उठून रोज तीन ते चार तास सराव व व्यायाम करू लागलो. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयर्न मॅन रेसमध्येही मी भाग घेतला होता. तिन्ही ॲक्टिव्हीटीचं अंतर मी पार केले. पण वेळेत अकरा मिनिटे उशीर झाल्यामुळे मला आयर्न मॅन टायटल मिळू शकले नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, गोव्यामध्ये असणारी ह्युमिडिटी, उष्णता ही धुळ्यापेक्षा खूपच वेगळी आहे आणि ज्या पद्धतीने आपण धुळ्यात पाणी व इलेक्ट्रॉनिक्स घेतो त्याप्रमाणे तिथे घेऊन चालणार नाही. आपला सराव व माहिती कमी आहे यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी तीथे आलेले जगभरातले इतर स्पर्धक, त्यांची साधने, त्यांच्याबरोबर असणारे कोच व टीम या सर्व गोष्टींमध्ये आपण नक्कीच मागे आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षी अधिक सराव करण्याची आवश्यकता आहे.
मागच्या वर्षी झालेल्या सर्व चुकांमधून काय करायचे व काय करायचे नाही या गोष्टी ठरल्या. परत सरावाला सुरुवात झाली. ह्या वर्षी मी मुद्दाम रेसच्या पाच दिवस आधी गोव्याला गेलो व समुद्रात पोहण्याचा सराव केला. मागच्या वेळेस मी कुठल्याही सरावाशिवाय सरळ समुद्रात पोहण्याचा घेतलेला निर्णय मूर्खपणाचा होता. हे लक्षात ठेवून यावेळेस मी त्यात समुद्र सरावाची सुधारणा केली. शेवटचे तीन-चार महिने दर रविवारी हळूहळू अंतर वाढवत जाऊन रेससाठी आवश्यक असणाऱ्या अंतराचा व्यवस्थित सराव केला. पण त्यामुळे कुटुंबासाठी द्यायचा वेळ हा शून्यावर आला. मी प्रत्येक सुटीचा दिवस लॉंग ऍक्टिव्हिटीसाठी देऊ लागलो. तरीही सिद्धी, सानिका, आई, बाबा यांनी कधीही याबाबत तक्रार केली नाही. शेवटचा एक महिना प्रॅक्टिस खूप जास्त सुरू असल्यामुळे मी ऑफिसमध्ये देखील अर्धाच वेळ जात होतो. माझे ऑफिसमधील सहकारी अतुल कुलकर्णी व विजय गवळे यांच्याशी मी आधीच चर्चा केली होती की, अशा रेसमध्ये मी भाग घेतो आहे आणि त्यामुळे कदाचित तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल. त्यांनी आनंदाने याला मान्यता दिली. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माझी बायको सानिका ही ऑफिसमध्ये देखील बरेचसे माझे काम सांभाळून घेत होती व घरामध्ये तर सिद्धी व सानिका यांनी मला रेससाठी पूर्णपणे मोकळीक दिली होती. कुठल्याही प्रकारे तक्रार न करता त्यांनी मला खूप साथ दिली. रविवारी बऱ्याच वेळा रनिंग आम्ही बरोबरच करायचो. गोव्याला देखील माझ्याबरोबर पाच दिवस येऊन तिने संपूर्णपणे घरचा आहार मला गोव्यामध्ये सुद्धा उपलब्ध करून दिला. बऱ्याचशा गोष्टी धुळ्यातून करून नेल्या होत्या व बाकी फळे, मूग, मठ याला मोड काढून त्याचं सॅलड, ईतर पौष्टिक व सहज बनवता येणाऱ्या गोष्टी गोव्यामध्ये ती मला बनवून देत होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे यावर्षी रेसमध्ये मी 22 मिनिटं वेळेच्या आधी रेस पूर्ण केली व आयर्न मॅन हा सन्मानाचा किताब मिळवला.
खरंतर यावर्षीची रेस मागच्या वर्षीपेक्षा अधिक कठिण होती. कारण यावर्षी सायकलिंगमध्ये जास्त चढाव असणारा रूट होता. 90 किलोमीटर अंतर पार करत असताना सातशे मीटरपेक्षा जास्त चढावाची उंची गाठायची होती. म्हणजे जवळजवळ सव्वा दोनशे मजल्या एवढ्या उंचीची इमारत सायकलवर चढून जायचे व त्याची लांबी 90 किलोमीटर असेल इतका कठीण सायकलिंगचा रूट होता. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असणारी शर्यत यावर्षी ऑक्टोबरमध्ये होती. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा सामना करत गोव्याच्या प्रचंड ह्युमिडिटीमध्ये रेस करणे तसे अवघडच होते. यावेळेस गोव्यातील वातावरण एवढे कठीण होते की, रेसच्या दरम्यान एका 26 वर्षीय तरुणाचा डीहायड्रेशनने मृत्यू देखील झाला. बऱ्याचशा पार्टिसिपंटला क्रॅम्पिंग येऊन ते रेस पूर्ण करू शकले नाहीत. पण कुटुंबीयासकट इतर सर्वांनी दिलेली साथ, शास्त्रशुद्ध केलेला सराव या सगळ्याच्या जोरावर मी ‘कॉमन मॅन’ ते ‘आयर्न मॅन’ हा प्रवास पूर्ण करू शकलो. ठरवल्याप्रमाणे रेसच्या फिनिश लाईनला मी फिजिकली परिपूर्ण फिट अवस्थेमध्ये पोहोचलो. मला कुठल्याही प्रकारे क्रॅम्पिंग किंवा ईतर त्रास झाला नाही. रेस संपल्यानंतर देखील मला कुठल्याही आधाराची गरज लागली नाही. मी अगदी सहज एक किलोमीटर चालत माझ्या हॉटेलच्या रूम पर्यंत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी स्वतः गाडी चालवून गोवा ते कोल्हापूर आलो व तिथून ड्रायव्हरने सलग 16 तास प्रवास करून धुळ्यापर्यंत आणले. या सगळ्या काळात मला कुठल्याही विश्रांतीची तेवढी आवश्यकता भासली नाही. हे सर्व साध्य झाले ते केवळ सराव, आहार व अतिशय काटेकोरपणे शिस्त पाळल्यामुळेच.
धुळ्याहून गोव्याला सायकल नेण्यासाठी गाडीला लावण्याचा स्टॅन्ड, धुळे सायकलिस्ट मधील मित्र निखिल बडगुजर यांनी आणून दिला. नुसताच दिला असं नाही तर तो गाडीला फिट देखील करून दिला. धुळे सायकलिस्ट मधील दुसरे मित्र डॉ. विराज पाटील यांनी आपणहून त्यांच्याकडे असणारे सायकलसाठीचे इम्पोर्टेड टायर आणून दिले. त्यावरच रेस करण्याचा आग्रह धरला. हवा भरण्यासाठी वापरण्याचा इलेक्ट्रिक पंप ऑनलाईन मिळत नव्हता. हे समजताच धुळे सायकलिंगचे पाखले त्यांचा पंप घेऊन पोहोचले. म्हणाले, माझा पंप वापरा रेससाठी. रेसमध्ये मी पळत असलो तरी देखील कळत नकळत अशा तऱ्हेने माझ्यासाठी किमान वीस-बावीस लोक माझ्या आजूबाजूला धावत होते. ज्यांच्यामुळे मी ही रेस पूर्ण करू शकलो. रेस सुरू असताना ऑनलाइन माझा स्पीड काय आहे? मी कुठपर्यंत पोहोचलो आहे? हे बघून धुळे रोड रनरचे योगेश राठोड यांनी काळजीपोटी धुळ्याहून थेट गोव्याला माझ्या बायकोला फोन करून चिंता व्यक्त केली की सरांचा रनिंगचा स्पीड थोडा कमी वाटतो आहे. त्यांना जमलं तर स्पीड वाढवायला सांगा. थोड्यासाठी रेस राहायला नको. धुळ्याचे पोलीस अधिकारी किशोर काळे हे देखील या रेसमध्ये सहभागी होणार होते. पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना सहभाग घेता आला नाही. पण त्यांनी आवर्जून मी गोव्याला गेल्यावर गोवा ओपन वॉटर स्विमिंग क्लब यांच्या माध्यमातून समुद्र स्विमिंगचे शास्त्रशुद्ध धडे घेण्याचा सल्ला दिला. जो मला खूप उपयोगात आला. धुळ्यात असून गोव्यात सुरू असणाऱ्या माझ्या रेसची किती काळजी या सर्वांना होती. यांच्या प्रेमामुळेच मी ही रेस पूर्ण करू शकलो.
या रेसने माझे पूर्ण आयुष्य बदलून टाकले. माणसाच्या आयुष्यात, आहारात आणि वागण्यात शिस्त आल्यास किती सकारात्मक बदल होतात. वेळेचे नियोजन करून कमी वेळेत देखील तेवढेच काम माणूस कसे करू शकतो. मनाचा निग्रह ठेवून खाण्यापिण्यावर बंधन घालून तब्येत चांगली कशी ठेवता येऊ शकते. मला गोड प्रचंड आवडते. पण गेले सहा महिने मी साखरेचा एक दाणा देखील खाल्ला नाही व इतर अनेक रोजच्या जीवनातल्या गोष्टी या रेसने मला शिकविल्या. आयर्न मॅन हे टायटल मिळवणे यापेक्षा हे टायटल मिळवत असताना जगलेले क्षण माझ्यासाठी जास्त काही शिकवून गेले. रेसच्या दरम्यान, ट्रेनिंगच्या दरम्यान मला आलेले अनुभव याबाबतीत एक वेगळा लेख लिहावा लागेल.
या रेस मधून मिळालेले काही अनमोल धडे जे जीवनामध्ये उपयोगी पडतील…
1) कुठल्याही बाबतीत मनाची तयारी करणे अधिक कठीण असते. एकदा मनाची तयारी झाली की शरीराची तयारी व इतर निग्रह आपोआप जमायला लागतो.
2) प्रचंड उभा चढ चढत असताना समोर न बघता खाली बघत राहायचं व पाडलिंग करत राहायचं तरच आपण चढ चढू शकतो. वर बघून उगाच अजून किती उंची चढायची आहे याचा विचार करत बसल्यास पायडलिंगकडे दुर्लक्ष होते व आपण चढ चढू शकत नाही. जीवनात देखील पुढच्या संकटाचा जास्त विचार न करता आत्ता या क्षणाला जे आवश्यक आहे ते खाली मान घालून करत राहणे आवश्यक आहे.
3) सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, आहार, व्यायाम या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातलं एक प्रिन्सिपल सारख आहे. तुम्ही प्रोसेस नीट फॉलो करा. आऊट कमचा जास्त विचार करू नका. म्हणजे भगवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करा परिणामांची काळजी करू नका. जर तुमचे कर्म योग्य असेल तर परिणाम नक्कीच योग्य मिळतील.
4) कितीही अंतर पार करायचे असेल तरी एका वेळेला एक पाऊल टाकणं आवश्यक असते. पण पाऊल थांबू न देणेही तितकच आवश्यक असते. तरच तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. अगदी तुम्हाला हत्ती देखील खायचा असेल तरी एका वेळेला एक घास या पद्धतीने हळूहळू तुम्ही पूर्ण हत्ती खाऊन संपवू शकता. सातत्य महत्त्वाचे.
5) या रेसमध्ये माझ्यापेक्षा वयाने जास्त असणारे लोक देखील होते. त्याचप्रमाणे माझ्या वयाच्या लोकांनी रेस माझ्यापेक्षा कमी वेळात संपवली. त्यामुळे आपल्याला अजून जमिनीवर पाय ठेवून खूप शिकायचं आहे. आणि आपण अजून खूप मागे आहोत. समजतो त्यापेक्षा आपण फारच लहान आहोत याची झालेली जाणीव.