डेंग्यूमुळे धुळ्यात सहा जणांचा मृत्यू, महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीची मागणी
धुळे : डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी धुळे महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यापासून धुळे शहरामध्ये डेंग्यू रोगाने थैमान घातले आहे. घरोघरी डेंग्यूचे रुग्ण आहेत. शहरातील बहुतांश दवाखाने डेंग्यू रुग्णांनी भरलेले आहेत. या सर्व गोष्टीला महानगरपालिका प्रशासन, अधिकारी आणि सत्ताधारी पदाधिकारी जबाबदार आहेत. कारण डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरामध्ये फवारणी केली जात नाही. गटारी, नाल्यांमध्ये औषधी टाकली गेली नाही. शहरात साफसफाई नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. डेंग्यू रोगामुळे जवळपास सहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योगपती गौरव जगताप यांचे डेंग्यूमुळे दुर्दैवी निधन झाले. या सर्व मृत्यूला धुळे महानगरपालिका जबाबदार आहे.
डेंग्यू डासांमुळे मृत्यू पावलेल्या गौरव जगताप व इतर सहा जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेले धुळे महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्ष्याच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, राष्ट्रीय खजिनदार जोसेफ मलबारी, भानुदास लोहार, यशवंत पाटील, राजू डोमाळे, गोरख शर्मा, रईस काझी, राजेंद्र सोलंकी, नजीर शेख, दीपक देवरे, सोनू घारू, राजेंद्र चौधरी, राजेश तिवारी, मंगलदास लोहार, गोलू नागमल, समद शेख, बिलाल शेख, नजीर शेख, युसूफ शेख, चेतन पाटील, पत्रकार रईस शेख, शकीला बक्ष, चेतना मोरे, रश्मी घेटे, विश्वजीत देसले, रामेश्वर साबरे, भोला सैंदाणे, वैभव पाटील, जयदीप बागल, डॉमनिक मलबारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा