धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !
धुळे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मोहाडी उपनगरातील सुनील जाधव नामक एका संशयिताला पोलिसांनी 18 तारखेला पकडले. या कारवाईबद्दल धुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु धुळे शहरात पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचा आवाजही सर्वसामान्यांच्या चर्चेतून ऐकायला मिळतोय.
कारण विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत अनेकांवर पोलिसांनी कारवाई करून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. पण तरीही गावठी पिस्तूल मिरविण्याची क्रेझ काही कमी झाली नाही. एका मुलासह त्याच्या दोन मित्रांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री देवपूरातील गोंदूर रस्त्यावर शनी मंदिरासमोरील कॉलनीत घडली. तरूणावर धारदार चाकूने वार करण्यात आला. या घटनेत गोळीबार झाल्याचेही म्हटले आहे. हल्ल्यात जखमी तरूणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी पकडलेल्या सुनील जाधव या संशयितावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई करूनही एखादा संशयित गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन शहरात हिंडण्याची हिंमत कशी करू शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये खुनाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यानेही पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. पोलिसांकडून वेळोवेळी यशस्वी कारवाई होत असली तरी, गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा वचक निर्माण होत नसल्याचेही बोलले जात आहे.
धुळे पोलिसांची महत्वाची कारवाई : मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. सुनील रमेश जाधव (रा. पिंपळादेवीनगर, मोहाडी उपनगर, धुळे) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांना टिप मिळाली अन्… : या कारवाईविषयी बुधवारी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. १८ ऑक्टोबरला एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुनील रमेश जाधव हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत फिरत असतो. तो सध्या चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्तशृंगीनगर येथे रस्त्यावर उभा आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एलसीबी पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांना पाहून सुनील जाधव याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पाठलाग करून शिताफीने पकडले.
गावठी पिस्तूल, काडतुस जप्त : संशयित आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस असा ४२ हजाराचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी पोलीस नाईक शशिकांत देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील जाधव सराईत गुन्हेगार : सुनील जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात खुनासह विविध गंभीर गुन्हे मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी दिली. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अर्थात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
कारवाई पथकामध्ये यांचा समावेश : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उप निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस कर्मचारी अशोक पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी यांनी केली.
हेही वाचा
धुळे शहरात गुंड, पुंड, मवाली, भुरट्यांना पोलीसांचा धाक नसल्यामुळे ते मोकाट झाले आहेत. या गुन्हेगारा बाबत तक्रारी करुन ही पोलीस कारवाया करत नसल्यामुळे या गुंडांची गुर्मी आणि माज अधिक वाढत आहे. जर धुळे शहरातील गुन्हेगारी कारवाया थांबवायच्या असतील तर या पोलीसांनीच या गुंड लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कठोर कारवाया करणे गरजेचे आहे.