आदिवासींमध्ये धनगरांसह धनदांडग्या जातींची घुसखोरी खपवून घेणार नाहीत!
धुळे : आदिवासी जमातीत इतर धनदांडग्या जातींची घुसखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाची भूमिका न घेणाऱ्या राजकीय पक्षांना आगामी निवडणुकांमध्ये आदिवासी पाड्यांवर फिरकू देणार नाहीत, असा इशारा एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी धुळ्यात दिला.
धनगर समाजासह इतर कोणत्याही समाजाला आदिवासी खोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी करत धुळे जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी धुळे शहरात शुक्रवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, माजी आमदार वसंत सूर्यवंशी, राजकुमार सूर्यवंशी, अशोक धुळकर, राज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.
भाजपचा एक आमदार धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी हेलिकॉप्टरमधून राज्यभर जागर सभा घेत आहे. परंतु आदिवासींचे 25 आमदार असूनही आरक्षण बचाव संघर्षात ते सहभागी होताना दिसत नाहीत. सात-आठ आमदार सोडले तर बाकीच्यांना आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणाशी काही देणेघेणे नाही, अशी खंत शिवाजी ढवळे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी या मुद्यावरून आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्यावरही टीका केली.
धनगर समाज आमच्या सारखाच गरीब आहे. त्यामुळे त्यांना शासनाने वेगळ्या कोट्यातून आरक्षण द्यावे. पण आदिवासी कोट्यातून आरक्षण देऊ नये. धनगर समाज आणि आदिवासी समाजाची संस्कृती वेगळी आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर या धनगर समाजाच्या दैवत आहेत, तर देवी शबरी या आमच्या दैवत आहेत. यावरून धनगर समाज आदिवासी नसल्याचे स्पष्ट होते अशी भूमिका या मोर्चा द्वारे विशद करण्यात आली.
सांगवी हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
शिरपूर तालुक्यातील सांगवी हिंसाचार प्रकरणात आदिवासींवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शुक्रवारी जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध पक्ष संघटनांनी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सांगवी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त लावलेले आदिवासी क्रांतिवीरांचे बॅनर चारण समाजातील लोकांनी फाडल्यानंतर झालेल्या उद्रेक प्रकरणात पोलिसांनी आदिवासींवर अन्याय केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, आदिवासींवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी दंगल प्रकरणी पोलिसांनी आदिवासी समाजाच्या 200 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाशी संबंधित सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांची 26 जुलै ते आज पावतो फोन रेकॉर्डिंग तपासावी, सांगवी दंगलीची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना तात्काळ निलंबित करावे, सांगवी प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हा हमला चारण व त्याच्या सहकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, सांगवी दंगलीत पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुदुराचा वापर करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करावी, जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावरील दंगलीचे गुन्हे रद्द केले त्याचप्रमाणे सांगवी येथील घटनेतील आदिवासी नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत, अतिक्रमणाच्या नावाखाली भेदभाव करून एकतर्फी केलेली कारवाई तात्काळ थांबवावी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कर्मचारी लाला व त्याच्या सहकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
निवेदनावर संगीता कोकणी, मीराबाई कोकणी, जयलु कोकणी, संगीता कोकणी, कल्पना कोकणी, चंद्रा कोकणी, निर्मला कोकणी, सुमन कोकणी, अशोक धुळकर, शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी नेते दीपक अहिरे, बंटी वाघ, अजय पवार, रवी पवार यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि महिला तसेच कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा
Comments 1