झेडपी शाळेच्या मुलांना भेटून सीईओ शुभम गुप्ता झाले भाऊक
धुळे : तालुक्यातील हडसुने आणि आहिल्यादेवीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत मुला-मुलींना भेटल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता भाऊक झाल्याचे पहायला मिळाले.
इतक्या चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याचे आपण पहिल्यांदाच पाहत आहोत, अशा शब्दात त्यांनी शाळा, शिक्षक, गावकरी आणि विद्यार्थ्यांचा गौरव केला. शाळेतील या वातावरणाला पाहून, या विद्यार्थ्यांना पाहून आणि येथील शिक्षक वर्गाला पाहून खरोखर भारावून गेलो आहे, असे ते म्हणाले. हडसुने, आहिल्यादेवीनगर शाळेसाठी भविष्यात काही मदत लागली तर निश्चितच मी तो प्रयत्न करेन. तसे नक्की मला सांगा, असे शुभम गुप्ता यांनी सांगितले.
आपले मनोगत व्यक्त करताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. बोलताना अतीशय भावनिक झाल्याने त्यांचा कंठ दाटून आला. धुळे तालुक्यातील डोंगराळ प्रदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक किती कष्ट घेत असतील, त्यांच्या मनात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची किती जिद्द असेल, अशा शब्दात त्यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता सध्या विविध शाळांमध्ये भेट देऊन शाळेचा आणि शिक्षणाचा दर्जा जाणून घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी (19 Oct.) हडसुने शाळेला भेट दिली. जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक, सरपंच आणि गावकरी यांनी त्यांना आमंत्रितही केले होते. यानिमित्त शाळेत एक छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी बोरविहिर गटाचे जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल गवळी, माजी सरपंच संजय पाटील, माजी सरपंच लालचंद पाटील, भारत देवरे, ज्ञानेश्वर सुळे उपस्थित होते.