ॲड. प्रकाश आंबेडकर यांची 26 ऑक्टोबरला धुळ्यात आदिवासी एल्गार महासभा
धुळे : आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी हा समाज सत्ताधारी बनला पाहिजे. त्यासाठी आदिवासी समुदायाला दबाव गट निर्माण करावा लागेल. वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा दबावगट निर्माण होईल.त्यासाठीच वंचीतचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धुळ्यात दि.२६ रोजी दुपारी ३ वाजता साक्री रोडवरील विद्यावर्धीनी महाविद्यालयाच्या मैदानावर आदिवासी एल्गार महासभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन एकलव्य आघाडीचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतेल्या पत्रकार परिषदेत अनिल जाधव म्हणाले की, धुळे जिल्ह्यात आदिवासी भिल्ल समाजाची संख्या मोठी असून हा समाज आंबेडकरी चळवळीकडे वळला पाहिजे. ओबीसी, दलितांपेक्षा जास्त हक्क अधिकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला दिली आहे.आमचे प्रशासन असावे, जलजमीवर आमचा हक्क असावा यासाठी आदिवासी क्रांतीकारक लढले. आदिवासी क्रांतीकारकांचे म्हणणे डॉ.आंबेडकरांनी संविधानातून आदिवासी जनतेला दिले. आदिवासींच्या कल्याणासाठीच्या समितीमध्ये आदिवासी आमदार सदस्य असावेत. ते आहेतही परंतु ते सदस्य जनतेच्या बाजूने बोलायला तयार नाहीत. कारण ते पक्षांचे गुलाम झालेले आहेत.त्यामुळे आदिवासींचे कल्याण झालेले नाही. आम्हाला न मागता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. आदिवासी समाज आज जो भरकटला आहे. तो प्रकाश आंबेडकरांसोबत राहिला तर समाजाची उन्नती होईल. समाजाच्या उन्नतीसाठी हा समाज सत्ताधारी बनावा लागेल. त्यांच्या हक्कासाठी वंचीत बहुजन आघाडी लढत आहे. वंचीत आघाडीचे रविकांत वाघ पत्रकार परिषदेत म्हणाले की, ९० हजार एसटी जागांवर बोगस लोक बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देवूनही त्यांची हकालपट्टी होत नाही. त्यामुळैच आपल्याला दबाव गट निर्माण करावा लागेल. वंचीत बहुजन आघाडीच्या या एल्गार महासभेला लाखावर जनता येईल असा आशावादही व्यक्त करण्यात आला.
यावेळी अनिल जाधव, एकलव्य आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संतोष जाधव, ॲड. रविकांत वाघ, वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात उपस्थित होते.