प्रधानमंत्र्यांची मानसिकता लोकशाहीला घातक
धुळे : प्रधानमंत्र्यांची मानसिकता लोकशाहीला घातक आहे. पंतप्रधानाचा सरपंच झाल्यावर आपण काय करणार, असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता बोचरी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ चमकोगिरी केल्याशिवाय अन्य कोणतेही काम केले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देशातील जनतेने त्यांना घरी पाठवावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.
आदिवासी एल्गार परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर गुरुवारी धुळे दौऱ्यावर आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवर विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होणाऱ्या आदिवासी एल्गार सभेला संबोधित करण्याआधी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. सत्ता हस्तगत करण्यासाठी आरएसएस आणि भारतीय जनता पक्ष जाती धर्मात व समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. धनगर आणि कोळी समाज आदिवासी आरक्षणासाठी संघर्ष करीत आहेत तर मराठा समाज देखील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. याचा गैरफायदा घेत आरएसएस आणि भाजप मिळून धनगर आणि कोळी समाजाचा आदिवासींशी संघर्ष पेटवून दिला आहे. तसेच मराठा समाजात गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी दुही निर्माण केली जात आहे. शिवाय ओबीसी आणि मराठा असा संघर्षही यांनीच लावून दिला आहे. निवडणुकांच्या आधी दुही निर्माण करून वातावरण खराब करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. मणीपूरमध्ये हिंदू आदिवासींना हाताशी धरून ख्रिश्चन आदिवासींचा नरसंहार करण्यात आला. तेथील परिस्थिती अतिशय टोकाला गेली. तशाच पद्धतीने विविध समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्रात देखील प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्या चेहर्यात एवढे अडकले की त्यांना कुणाचाच चेहरा चालत नाही. अगदी बॉडीगार्ड चाहु नाही. आपले व्यक्तिमत्व इतर चेहर्यामुळे झाकले जाईल, अशी भीती मोदींना वाटते म्हणून ते फक्त स्वत:चाच चेहरा दाखवितात अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केली. ते वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी एल्गार सभेपूर्वी गुलमोहर शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अत्यंत परखड शब्दात आंबेडकर यांनी भाजप, आरएसएस व मोदींवर टीका केली.
आंबेडकर म्हणाले की, भाजप स्वत:ला हिंदूंचे सरकार म्हणते. मात्र वर्षभरात एक लाख तेरा हजार हिंदुंनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. याबाबत मात्र सनातन धर्माचे प्रचारक बोलत नाही. सनातन हेच हिंदुंना त्रास देताहेत. मोदींचा खोटा प्रचार आरएसएस करते. जी 20 परिषदेवर कोट्यावधीचा खर्च केला. यामागे मोदी हे देशाचेच नव्हे तर जगाचे नेते आहेत असा प्रचार करण्याचा हेतू होता. मात्र मोदींची जो बायडेन यांनी चांगलीच फजिती केली.
केजरीवाल विचारत असलेली डिग्री मोदी दाखवत नाहीत. यावरुन मोदींना इंग्रजी येत नाही याला पुष्टी मिळते. सत्तेसाठी भाजप समाजाला दुभंगत ठेवत आहेत. मोदींनी स्वत:ची अवस्था सरपंचासारखी केली आहे. गावात काहीही झाले की सरपंच म्हणतो मीच केले. तसे मोदी सरपंच झाले आहेत. मराठा समाज व आरक्षणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, निजामी मराठा रयतेच्या मराठा समाजाला स्वीकारत नाही हा एक जातीयवादच आहे.
आदिवासी एल्गार सभेचे आयोजन एकलव्य आघाडीचे उपाध्यक्ष ॲड. संतोष जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, दिलीप मोहिते, शंकर खरात, पंडित मोरे यांनी केले होते.