धुळे पेटविण्याचा ‘गंगाधर-शक्तिमान’चा डाव आम्ही उधळून लावू
धुळे : जाती-धर्मात तेढ निर्माण करणार्या, दंगलीवर स्वतःचे राजकारण जीवंत ठेवू पाहणार्या, राजकारणाची पोळी भाजणार्या राजकीय ‘गंगाधर-शक्तीमान’चा धुळे पेटविण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश महेंद्र भावसार यांनी केला. आपल्याकडे याबाबत पुरावे असून, संबंधीत गंगाधर आणि शक्तीमानची नावे पोलिसांकडे देवून पुरावे देखील पोलिस प्रशासनाला देणार असल्याचे भावसार यांनी सांगितले.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज सकाळी ११.३० वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगत पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत भावसार म्हणाले की, धुळे शहरात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००८ च्या दंगलीची पुनरावृत्ती होवू नये यासाठीच मी तुमच्या समोर आलो आहे. विकासाच्या मुद्यावर राजकारण करु न शकणार्यांचेे शहरात रक्ताची होळी खेळण्याचा डाव असल्याचा संशय माझ्यासह जनतेत आहे. राजकीय अपयश झाकण्यासाठी, राजकारणात स्वतःला जीवंत ठेवण्यासाठी संबंधीतांकडे कोणतेही मुद्दे दिसत नाही. माझ्यासह जनतेत संशय असण्यााचे कारण म्हणजे काल परवा बालाजी रथोत्सवात एका तरुणाला झालेली मारहाण व त्यानंतर क्षणातच झालेली दगडफेक ही घटना संशयास्पद नव्हेतर नियोजीत कट असल्याचे भासते. दंगलीचे निमित्त शोधण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.
शहरातील दोन नेत्यांचे निवडणुक जिंकण्यासाठी धु्रवीकरण करुन शहराला खायीत नेण्याचा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळे शहरातील भक्तीमय वातावरणात बालाजी रथोत्सवा दरम्यान दंगली घडविण्यासाठी रसद पुरविणारा नेता कोण शहरातील सराईत व गंभिर गुन्हे असलेल्या गावगुंडांना नेमकं पोसतोय कोण असे सवालही सारांश भावसार यांनी उपस्थित केला. राजकीय नेत्यांकडे मुद्दे उरले नाहीत म्हणून विटंबना तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ही नेते मंडळी करीत असून दोन्हीकडील नेते म्हणजेच नाण्यावरील छापे काटे आहेत. संबंधीत नेत्यांचे कॉल डिटेल्स काढून पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा असेही भावसार म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत मयुर बोरसे, उमेश महाजन आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा