नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्त करा! आमदार कुणाल पाटील वनमंत्र्यांना भेटले
धुळे : तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या वारसांना तातडीने 25 लाख रुपये द्यावेत. तसेच त्या नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद अथवा बेशुध्द करावे आणि शक्य न झाल्यास ठार करावे, असे आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांना गुरुवारी दिले.
बिबट्याचा बंदोबस्त व्हावा आणि वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार कुणाल यांनी वनमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सदर आदेश धुळे उपवनसंरक्षक यांना दिले. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यात बिबट्याने धुडगूस घातला आहे. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला आहे. तर एका बालकाला गंभीर जखमी केले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आमदार कुणाल पाटील यांनी 26 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4 वाजता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आणि त्यांना धुळे तालुक्यातील सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांना दिले. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री दालनातून नागपूर येथील राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुध्द करण्याचे आणि तसे शक्य न झाल्यास ठार मारण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
दरम्यान, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करुन वारसांना तातडीने 25 लक्ष रुपये मदत द्यावी, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच पुणे येथील वनविभागाचे व एनजीओचे पथक या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून लवकरच या बिबट्यांला जेरबंद करण्यात यश येईल अशी खात्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आ. कुणाल पाटील यांना दिली. वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली असून धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे येथील वनविभागाची पथके या रेस्क्यू टीममध्ये सहभागी झाली आहेत. रात्रीच्या वेळी कॅमेरा ट्रॅप लावून हालचाली टीपण्याचा उपाय योग्य ठरतो. बिबट्याचे आवडते खाद्य श्वान देखील पिंजर्यात सावज म्हणून ठेवण्याचा प्रयोग केला जात आहे. बोरी पट्टयात अनेक ठिकाणी पिंजरे व कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत, अशी माहिती धुळे उपवनसंरक्षक अनिलकुमारसिंग यांनी आ. कुणाल पाटील आणि मंत्री ना. मुनगंटीवार यांना दिली.
हेही वाचा