कोतवाल, पोलीस पाटील परीक्षेला आलेल्या महिला उमेदवारांचा आत्मदहनाचा इशारा
धुळे : कोतवाल आणि पोलीस पाटील पदांसाठी रविवारी परीक्षा झाली. धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळा येथील केंद्रावर परीक्षा देण्यासाठी वेळेवर आलेल्या काही महिला व पुरुष उमेदवारांना प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी आणि कार्यकर्ते परीक्षार्थींच्या मदतीला धावून आले.
कोतवाल आणि पोलीस पाटील पद भरतीच्या परीक्षेसाठी हॉल तिकिटावर अकरा वाजेची वेळ दिली होती. त्यानुसार काही परीक्षार्थी साडेदहा वाजेच्या आधी आत गेले तर ग्रामीण भागातील काही परीक्षार्थी साडेदहा वाजेला कमलाबाई कन्या शाळेतील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. पण तोपर्यंत परीक्षा खोल्यांचे दरवाजे आणि मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.
“आम्ही वेळेवर म्हणजे साडेदहा वाजेला परीक्षा केंद्रावर पोहोचलो. आमच्याकडे ओळख पुरावा म्हणून ओरिजनल आधार कार्ड असताना त्या आधार कार्डच्या झेरॉक्स काढून आणाव्यात, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही समोरच असलेल्या झेरॉक्स दुकानावरून झेरॉक्स काढून आणल्या. पण परीक्षा केंद्रावर आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याचा आग्रह धरणाऱ्या काही परीक्षार्थींना धक्काबुक्की केली.” अशी माहिती परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींनी प्रसारमाध्यमांना दिली.
दरम्यान, परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना परीक्षार्थींच्या मदतीसाठी पाठविले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विनंती करूनही परीक्षार्थींना प्रवेश दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेले परीक्षार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी विद्यार्थ्यांचे काही एक म्हणणे ऐकून न घेता गाडीत बसून ते निघून गेले. त्यामुळे विद्यार्थी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर परीक्षार्थींनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
परंतु “परीक्षा झाली आहे. आता आम्ही काही करू शकत नाही. आपण दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्यात येईल.” असे उत्तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर संतापलेल्या महिला परीक्षार्थींनी आत्मदहनाचा इशारा दिला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी
परीक्षार्थींना प्रवेश नाकारून धक्काबुक्की करणारे कर्मचारी आणि पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर बोरसे-पाटील, शहर कार्याध्यक्ष कल्पेश चव्हाण, तालुकाध्यक्ष चिराग माळी, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश विभुते, युवक सरचिटणीस आकाश गुजर, आकाश शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांची नावे प्रितेश पाटील, आशा सोनवणे, नितीन पवार, सरला मालचे, सतीश पाटील, गायत्री पाटील, महेंद्र सैंदाणे, जितेंद्र सूर्यवंशी, हर्षल पाटील, भूषण आणि पंकज, अभिषेक पाटील, रूपाली कोळी, सुरज पाटील, रोशनी कोळी, प्रमिला पाटील, मनोहर पाटील, गौरव पाटील यांच्यासह अन्य काही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिले.
हेही वाचा