धुळे तालुक्यातील गाय गोठा व सिंचन विहीरींची मंजुरी प्रक्रिया अंतीम टप्प्यात
धुळे : रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय गोठा व सिंचन विहीरींच्या वैयक्तिक लाभार्थींची मंजूरी प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. तत्पूर्वी धुळे तालुक्यातील शेतकरींनी उर्वरीत प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता तत्काळ करुन घ्यावी, असे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्यासह धुळे पं. स. सभापती वंदना मोरे, उपसभापती देवेद्र माळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत मागेल त्याला विहीर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ. यात धुळे तालुक्यातील अल्पभुधारक शेतकर्यांकडून सिंचन विहीरींसाठी अर्ज मागविण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण व समृद्ध करणे या उद्दिष्ट्यातून गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या गाय गोठा अनुदान योजनेतंर्गत, जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी देण्यात येणार्या आर्थिक अनुदानासाठीही तालुक्यातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मधल्या काळात या सिंचन विहीरी व गाय गोठा मंजूरींची प्रक्रिया प्रलंबीत होती. याबाबत पाठपुरावा करुन सबंधीत विषय मार्गी लावण्यासाठी धुळे पंचायत समिती सभापती वंदना मोरे व उपसभापती देवेंद्र माळी यांचे संयुक्तरित्या प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांना यश आले असुन, लवकरच धुळे तालुक्यातील सिंचन विहीरी व गाय गोठ्यांचा विषय मार्गी लागणार आहे.
धुळे पंचायत समिती अंतर्गत प्राप्त अर्जापैकी एक हजारांवर अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच गाय गोठ्याचेही दोन हजारांवर अर्ज पात्र ठरले आहेत. या सिंचन विहीरी व गाय गोठास मंजुरी देऊन लाभार्थ्यी शेतकर्यांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात, छाननीअंती परिपूर्ण असलेल्या प्रस्तावांची मंजूरी अंतीम टप्प्यात आहे. प्रत्यक्ष जागेवर जावून व पूर्ण तपासणी करुन अंतीम यादी प्रसिध्द होईल. उर्वरीत प्रस्तावांची छाननी प्रक्रिया सुरु आहे. त्यात काही अपुर्णता असल्यास, शेतकर्यांकडून कागदपत्रे मागवून ते प्रस्ताव लगोलग मंजूर करावेत आणि मागेल त्याला तात्काळ विहीर देण्याच्या सूचना केल्या आहेत. तरी धुळे तालुक्यातील शेतकरी बंधूनी सिंचन विहीरी व गाय गोठा प्रस्तावातील त्रूटींची पूर्तता त्वरीत करुन घ्यावी असे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, पंचायत समिती सभापती वंदना मोरे, उपसभापती देवेंद्र माळी यांनी केले आहे.