मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फलकांना काळे फासले
धुळे : मराठा आरक्षणासाठी धुळ्यातील आंदोलनही आता तीव्र होऊ लागले आहे. राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना धुळे शहरात देखील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण केले जात नसल्याने मराठा समाजाच्या आंदोलकांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फलकांना काळे फासत निषेध केला. ज्या तोंडाने मंत्र्यांनी आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही म्हणून ती तोंडे आज काळे करण्याचे काम मराठा समाजाने केले, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक विनोद जगताप यांनी दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी घेवून मनोज जरांगे पाटील आतंरवली सराटी येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धुळ्यातही मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. आज मराठा समाजाच्या आंदोलकांनी धुळे शहर बसस्थानक तसेच संतोषी माता चौकासह जेलरोड परिसरात लावलेल्या शासनाच्या विविध फलकांवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रींडळातील मंत्र्यांच्या फोटोंवर काळ्या रंगाचे स्प्रे मारत काळे फासले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला.
आंदोलक विनोद जगताप यांच्यासह उपस्थित आंदोलकांनी तिव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मराठा साजाला दिलेले आश्वासन पूर्ण करत नाहीत आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे काही बरेवाईट झाल्यास त्याचे तिव्र परिणाम या सरकारला भोगावे लागतील. यापुढे आमचे आंदोलन अधिक तिव्र होईल, असा इशाराही विनोद जगताप यांनी दिला.
यावेळी भानुदास बगदे, रणजीतराजे भोसले, अशोक सुडके, साहेबराव देसाई, दीपक रौंदळ, ननोज ढवळे, दिनेश काळे, रवी नागणे, संजय बगदे, आबा कदम, अशोक शेळके, राजू इंगळे, निंबा मराठे, भैया शिंदे, मोतीलाल मराठे, ज्ञानेश्वर मराठे, संदीप पाटोळे, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल माने, सुरेश पवार, तुकारा बागुल, उल्हास यादव, भैय्या नागणे, बाळासाहेब ठाणगे, कैलास वाघमारे, विलास ढवळे, निलेश यादव, संतोष लकडे, भानुदास मराठे, महेश गायकवाड, सुकलाल मराठे आदी उपस्थित होते.
हेही वाचा