एसएसव्हीपीएस महाविद्यालय परिसरात लवकरच पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे
धुळे : शहरातील देवपूरात एसएसव्हीपीएस परिसरात आणि विशेष करून महाविद्यालयापासून ते शासकीय तंत्र निकेतनपर्यंतच्या रस्त्यावर पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविले जातील, असे ठोस आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. एसएसव्हीपीएस कॉलेजच्या बाजूने जाणाऱ्या या रस्त्यालगत रहदारीचे प्रमाण वाढले आहे. हजारो विद्यार्थ्यांचा वापर दिवसभरात या रस्त्यावरून असतो. या परिसरात अनेक अनुचित प्रकार घडत असतात. मुलींची छेड काढणे, दोन गटात भांडणे, चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी असे अनेक गुन्हे या परिसरात घडत असतात. नमूद परिसरात तीन महाविद्यालये व सहा खासगी क्लासेस असून, गर्दीचा रस्ता आहे. या रस्त्याला दोन कॅमेरे आहेत. वाढीव ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळण्यासाठी पोलीस मुख्यालयाकडून पाठपुरावा करून तातडीने कॅमेरे बसवावे, असे निवेदन युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी विद्यार्थी हित लक्षात घेता पाच नव्हे तर १० सीसीटिव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित करू, असे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरिष माळी, युवती सेना जिल्हा अधिकारी सोनी सोनार, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, महानगरप्रमुख मनोज जाधव, जयेश सोनवणे, सिद्धेश नाशिककर, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, तुषार सातपुते, दर्शन खंबायत, हर्षल फुलपगारे, सुमित तमखाने आदी युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.