गिरणा पांझण डावा कालव्यातून पाणी सोडा!
धुळे : तालुक्यातील तरवाडे परिसरातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गिरणा पांझण डावा कालव्यातून पाणी सोडावे अशा आशयाची मागणी इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी केली.
याबाबत गिरणा धरणावर जावून, सबंधीत अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सबंधीत अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आवर्तन सुटल्यास धुळे तालुक्यातील नाणे, सिताने, तरवाडे, चांदे, मोरदड, खोरदड, मोरदड तांडा, शिरुड, विंचूर आदी गावांचा पाणीप्रश्न तसेच गुरांचा चार्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गिरणा पांझण डावा कालव्यातून आवर्तन सोडा या मागणीसाठी, चाळीसगांव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गिरणा धरणावर अभियंता आर. आर. वाघ यांनी निवेदन स्विकारले.
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व पदाधिकार्यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, धुळे तालुक्यात यावर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा ३५ टक्के पाऊस कमी झाला. अत्यल्प पावसामुळे विहिरींची जल पातळी अत्यंत खालावली आहे. परिणामी धुळे तालुक्यातील नाणे, सिताने, तरवाडे, चांदे, मोरदड, खोरदड, मोरदड तांडा, शिरुड व विंचूर, आदी गावात पिण्याचा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष भासत आहे. याच्यावर उपाय योजना म्हणून गिरणा पांझण डावा कालव्यातून आवर्तन सोडल्यास धुळे तालुक्यातील वरील गावांबरोबरच, जळगाव जिल्ह्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच गुरांसाठी पाण्याचा व चार्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तरी गिरणा पांझण डावा कालव्यातून आवर्तन सोडावे व पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, पंचायत समिती सदस्य बाबाजी देसले, खोरदड सरपंच शरद पाटील, चांदे ग्रा.पं.सदस्य रावसाहेब पाटील, खोरदड सरपंच गोविंदा पाटील, आदी उपस्थित होते.
हेही वाचा