वाळू माफियांच्या विरोधात दरखेडा ग्रामस्थांनी थोपटले दंड
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा ग्रामस्थांनी वाळू माफियांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. शंभरपेक्षा अधिक ग्रामस्थांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. याबाबत सरपंच प्रतिनिधी गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरखेडा शिवारात बुराई नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ग्रामस्थांनी काही नुकसान केल्यास त्याला ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही. अनुसूचित प्रकार घडण्याच्या आधीच अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.