मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाचे प्रवेशद्वार बंद करून आमदारांचे आंदोलन
धुळे : मराठा आरक्षणसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. एकूणच मराठा समाजाच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. आ. फारुख शाह यांनी धुळे येथील आंदोलनस्थळी भेट देवून जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच मुंबई येथे जावून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येईल आणि सहकारी आमदारांना सोबत घेवून प्रसंगी आंदोलन करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
त्यानुसार आ. फारुख शाह आणि सहकारी आमदारांनी परवा मंत्रालयाचे प्रवेशद्वार बंद करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी आंदोलन केले. सताधाऱ्यांच्या टोलवा टोलवीमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न बिकट झालेला आहे. निव्वळ अशा अनागोंदी कारभाराच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसते.मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी यापूर्वी धुळे जिल्हा एमआयएम पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. तर आ. फारुख शाह यांच्या नेतृत्वात एमआयएम पक्षाचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी धुळे येथील साखळी उपोषणस्थळी भेट देवून पाठिंबा दिला होता आणि जाहीर केले की आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत.लवकरच याबाबत मंत्रालयात सहकारी आमदारांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल. त्यानुसार आज मंत्रालयाचे प्रवेशद्वार बंद करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. फारुख शाह यांच्यासोबत आ. निलेश लंके, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. दिलीप बनकर, आ. कैलास पाटील, आ. थोपटे, आ. सतिष चव्हाण, आ. काळे, आ. जितेश अंतापुरकर आदी उपस्थित होते.