रस्त्यावरून उठविलेल्या पथविक्रेत्यांनी गाठले कलेक्टर ऑफीस
धुळे : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळेच विस्थापीत होणार्या किरकोळ व्रिकेत्यांना पर्यायी जागा म्हणून दत्तमंदिर परिसरातील आरक्षीत भुखंडाची जागा देण्यात यावी तसेच हा भुखंड गिळंकृत करु पाहणार्या भुमाफियांसह संंबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) चे विधानसभा संघटक ललीत माळी यांनी केली.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवपूर दत्तमंदिर परिसरातील सर्वे नं.३५ पैकी सीटी सर्वे नंबर ८४९४ हा भुखंड शहर मंजुर विकास योजनेंतर्गत मार्केटसाठी आरक्षीत करण्यात आली आहे. सन १९१२ पासून आतापावेतो तीन वेळा ही जागा आरक्षीत झाली आहे. भुसंपादनाची कारवाई न झाल्याने भुमाफियांचे फावले असून त्यांनी हा भुखंड गिळंकृत केला आहे. दि.२९ मार्च २३ रोजी झालेल्या महासभेत महापालिकेचे भुखंड बेकायदेशिररित्या गिळंकृत करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष त्यावर कार्यवाही झालीच नाही. आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे दत्तमंदिर ते नगावबारीपर्यंतचे भाजीविक्रेते तसेच किरकोळ व्यावसायीक विस्थापीत झाले आहे. हातावर पोट असणार्या या गरीबांना पर्यायी जागा म्हणून तात्पुरत्या स्वरुपात दिल्यास एैन सणासुध्दीत त्यांच्या घरची चुल पेटणार आहे,तेव्हा सहानुभुतीपूर्वक या मागणीचा विचार व्हावा तसेच भुमाफिया व त्याला मदत करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी ललीत माळी यांच्या समवेत देवपुर दत्त मंदिर परिसरातील भाजी व्रिकेत्यांसह किरकोळ व्यावसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.