आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्यामुळे पावणे दोन कोटींचा निधी
धुळे : अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत धुळे शहरातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात विकासकामांसाठी एक कोटी 75 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार फारुख शाह यांनी पाठपुरावा केला होता.
धुळे शहरातील मोगलाई, जुने धुळे येथील नागरिकांनी तसेच नॅशनल ऊर्दू हायस्कूलच्या मोकळ्या जागेवर वॉल कंपाऊंड करण्यासाठी शाळेतील प्रमुखांनी निधीची मागणी केली होती. प्रभाग क्रमांक 19 मधील बहारे मदिना मशिद येथे पावसाळ्यात पाणी आल्याने मशिदीलगत परिसराचे नुकसान झाले. या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होती.
आमदार फारुख शाह यांनी अल्पसंख्याक विभागाकडे निधीची मागणी केली व धुळे शहरातील मोगलाई कब्रस्तान येथे संरक्षण भिंतीसाठी 50 लाख रुपये, जुने धुळे कब्रस्तानसाठी 25 लाख रुपये, नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मोकळ्या जागेवर संरक्षक भिंतीसाठी 50 लाख रुपये आणि प्रभाग क्रमांक 19 बहारे मदिना मशिदीच्या बाजूच्या नाल्याला संरक्षक भिंतीसाठी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.
आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे शहरातील वेगवेगळ्या कब्रस्तानसाठी, मंदिरांसाठी व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या कब्रस्तानांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी यापूर्वी आणलेला आहे. यामुळे आ. फारुख शाह यांच्याकडे शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या कामाच्या मंजुरीमुळे धुळे शहरातील अल्पसंख्याक समाजामध्ये समाधानाचे वातावरण असून, नागरिकांनी आ. फारुख शाह यांचे आभार मानले आहेत.