मनोज जरांगें पाटील यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मराठा समाजाची माणगी
धुळे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाने रस्त्यावर उतरत शहरातून मोर्चा काढला. जरांगेनी आंदोलन स्थगीतज्ञकरण्याची घोषणा केली आहे. मराठा समाज आंदोलनाचा इतिहास पाहता त्यांच्यासोबत दगाफटका होण्याची शययता नाकारता येत नाही. म्हणून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी, अशी मागणी मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. दरम्यान, जरांगे यांच्या समर्थनार्थ धुळ्यात सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलनही शुक्रवारी स्थगित करण्यात आले.
धुळे शहरात मराठा समाजाच्या मोर्चाला क्युमाईन क्लबपासून सुरूवात झाली. मोर्चात महिलांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा सरळ कमलाबाई हायस्कूलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सलग दहा दिवस आमरण उपोषण केले. त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका, गावागावात सर्वसामान्य जनतेनेही आंदोलन केले. तसेच सर्व समाजातील संघटना, राजकीय पक्ष, आमदार, खासदारांनी मागणीसाठी पाठींबा दिला. यापुर्वी देखील मराठा साजाला आरक्षण दिले पाहिजे, या मागणीसाठी स्व.अण्णासाहेब पाटील, आ. विनायक मेटे यांनी मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळावे, याकरिता अनेक आंदोलने केली. कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूबाबत समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ शकते अशी शंका आहे.
मराठा समाज आरक्षण मागणी करणार्या नेत्यांना ऐनकेन प्रकारे संपवले आहे. आता मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मागणीवर सरकारला जेरीस आणले आहे. यापूर्वी सरकारने हे आरक्षण आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यात अनेक जखमी झाले. सरकारचे आतापर्यंतचे कटकारस्थान पाहता आता मराठा समाजाचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगीत करण्याची घोषणा केली आहे. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी दोन पावले मागे घेतले. मात्र आंदोलन संपलेले नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना संपविण्यासाठी त्यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंतचा मराठा समाजाचा इतिहास पाहता अनेक मराठा लढवय्यांना संपवण्यासाठी काही वेळेस अण्णाजी पंतांची पिलावडं जागे होतात. हा इतिहास पहाता मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर महाराष्ट्र सरकारच जबाबदार राहील, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर सुनिता आहोळे, वनिता रायगुडे, ललिता शिंदे, अनिता वाघ, दिपाली बेंद्रे, वर्षा बेंद्रे, किरण बेंद्रे, संगिता जाधव, शोभा यादव, अरुणा मराठे, माया वाघ, भारती वाघ, संध्या जाधव, दिपा शिंदे, रूचिता गायकवाड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.