साडेतीन हजार कोटींचे स्टॅम्प नष्ट करू नका! आम्हाला विक्री करू द्या!!
धुळे : साडेतीन हजार कोटी रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट न करता मुद्रांक विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी शासनाकडे केली.
धुळे शहरातही मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वन विभागाने 3 नोव्हेंबर 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्रातील कोषागार कार्यालये व कोषागार अधिकारी प्रधान मुद्रांक कार्यालय मुंबई यांच्याकडे पडून असलेले स्टॅम्प पेपर अंदाजे तीन हजार 39 कोटी 55 लाख 53 हजार 72 रुपये 55 पैसे इतक्या किंमतीचे स्टॅम्प पेपर शासनाने नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर स्टॅम्प छपाईकरीता सात कोटी 53 लाख 56 हजार 656 रुपये 53 पैसे इतका खर्च आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रीकरीता 500 रुपयांच्या पुढील स्टॅम्प विक्री करीता बंद करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून कोषागारात पडलेले स्टॅम्प शासनाने नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शासनाकडे अनेकदा मागणी करीत आहोत. सदर स्टॅम्प आम्हास विक्रीसाठी उपलब्ध करुन द्या. परंतु सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व ते स्टॅम्प नष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर निर्णयास महाराष्ट्र मुद्रांक विक्रेते यांचा विरोध आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. शासन जे स्टॅम्प नष्ट करणार आहे ते स्टॅम्प आम्ही 6 महिन्यात विक्री करुन शासनाचे होणारे साडेतीन हजार करोड रुपयाचे नुकसान टाळू शकतो.
शासनास महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची विनंती आहे की, सदर स्टॅम्प नष्ट न करता मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावे व शासनाने काढलेले मुद्रांक नष्ट करण्याचे परिपत्रक रद्द करावे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री यांना पाठविण्यात आली आहे.
निवेदन देताना मुद्रांक विक्रेता संघटनेचे नेते माजी नगरसेवक दिलीप देवरे, नासिर पठाण, रविंद्र खानकरी, बाळू ठोंबरे, अशोक धात्रक, रविंद्र विधाते, रविंद्र माळी, बाबुराव कापकर, शिरीष देवरे, दयाराम माळी, अनिल अग्रवाल यांच्यासह मुद्रांक विक्रेते उपस्थित होते.