राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करू नका! आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाची मागणी
धुळे : राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करू नये, अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने केली आहे. तसेच दुर्बल आणि वंचित घटकांच्या विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित्त राज्यभर मोहिम हाती घेतली आहे.
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मान्यता कायमच्या बंद करण्याचा बातम्या रोज प्रसारित करण्यात येत आहेत. हे सत्य आहे की काय? जर पुरोगामी विचारांच्या राज्यात हे होत असेल तर कोट्यवधी गरिबांच्या मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा.
या आहेत प्रमुख मागण्या
अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून दरवर्षी वेळेत शिष्यवृत्ती द्यावी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजने अंतर्गत शेतजमिनीकरिता अर्ज दाखल करण्याऱ्यांना त्वरित शेत जमीन उपलब्ध करून द्यावी, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचा आहार द्यावा, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत रविदास, मौलाना आझाद आणि आदिवासी आर्थिक विकास या सर्व महामंडळाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी आणि शिक्षणासाठी थेट कर्ज उपलब्ध करून द्यावे, अपंग, माजी सैनिक, निराधार महिला आणि बेरोजगार तरुणांना रस्त्याच्या मोक्याच्या जागी स्टाॅल उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
या मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त ७ नोव्हेंबरपासून सदर अभियान संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत उपरोक्त मागण्यांचे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष छोटू मोरे, कैलास गर्दे, सुनील बैसाणे, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, सुनील मोरे, रमेश शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.