जुनी पेन्शन मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
धुळे : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी मोर्चा काढला. धुळ्यात देखील कामगार कल्याण भवनापासून ते क्युमाईन क्लबपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुनी पेन्शन लागू होण्यासाठी कर्मचारी शिक्षकांनी १४ ते २० मार्च २०२३ कालावधीत बेमुदत संपावर गेले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता देऊन लागु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने अभ्यास गट समितीकडून तीन महिन्यात अहवाल स्वीकारला जाईल, असेही आश्वासित केलेले असताना सहा महिने उलटले तरी सरकार गप्प आहे.
समन्वय समिती व सुकाणु समितीच्या घटक संघटनांच्या प्रलंबित मागण्या प्रकरणी संबंधित खाते प्रमुख व शासन सचिवांबरोबर स्वतंत्र चर्चा करून प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले असतानाही कोणत्याही संघटनेबरोबर चर्चा झाली नाही. कुटुंब मोर्चा व १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय यामुळे घाईघाईने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक झाली. परंतु सदरहू चर्चा सकारात्मक झाली तरी निर्णायत्मक झाली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत कुटुंब मोर्चा राज्यात सर्व जिल्हा व तालुकास्तरावर काढण्यात आला.
कुटुंब मोर्चा यशस्वी करण्यासाठी समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, राज्य सरकारी वर्ग ड कर्मचारी महासंघाचे सल्लागार एस. यु. तायडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कल्पेश माळी, खाजगी प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे विजयकुमार ढोबळे, रविंद्र पाटील, विजय देसले, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव एम. बी. मोरे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सतीष पाटील, जि. प. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन गुंडेलकर, माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे सचिव उदय तोरवणे, चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्य सहसचिव वाल्मिक चव्हाण, सिटुचे एल. आर. राव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव, उपाध्यक्ष राजेश घुगे, शिक्षक भारतीचे एन. एन. महाले, दामोदर पाटील, किरण मासुळे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सचिव दीपक महाले आदींनी परिश्रम घेतले.