धुळ्यात तरूणीचा खून, काही अंतरावर आढळला अन्य एका तरुणाचा मृतदेह
धुळे : शहरालगत असलेल्या नकाणे उपनगरात झालेल्या निकिता पाटील खून प्रकरणात ‘लव ट्रॅंगल’ची चर्चा आहे. पोलिसांचा तपास देखील त्याच दिशेने सुरू असल्याचे बोलले जात आहे. निकिता नावाच्या तरुणीचा बुधवारी सायंकाळी खून झाला. गुरूवारी सकाळी तिच्या घरापासून काही अंतरावर एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. याप्रकरणातील संशयीताने विष पिवून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांनी सांगितले. कारण मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटलीही पोलिसांना सापडली. या खून प्रकरणाशी मयताचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. परंतु मयत निकिताच्या कुटूंबियांनी महेश मराठे नावाच्या तरूणावर खुनाचा संशय घेतला असून, तशी फिर्याद पोलिसांना दिली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? : नकाणे रोडवरील बालाजीनगरात राहणार्या अनिकेत कल्याण पाटील (वय 23) या खाजगी नोकरी करणार्या तरुणाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 22 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास गावातीलच महेश मराठेने निकिताचा खून केला. निकिता पाटील (वय 21) हिने महेश मराठेसोबत प्रेम संबंधास नकार दिला होता. तसेच प्रेम संबंध ठेवण्याबाबत महेश तगादा लावत असल्याने मयत निकिताचा भाऊ अनिकेत याने महेशला मारहाणही केली होती. निकिताचा प्रेम संबंधाला नकार आणि अनिकेतने केलेली मारहाण याचा राग मनात धरुन संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास निकिताच्या गळ्यावर आणि शरीरावर धारधार चाकूने वार करुन तिचा खून केला. निकिताचा खून झाला त्यावेळी तिचे आई, वडील आणि भाऊ हे तिघे कामानिमित्त घराबाहेर होते. घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे, एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, देवपूर पोलीस ठाण्याचे पीआय सतीश घोटेकर, ठसे तज्ज्ञ एपीआय विनोद खरात, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पीएसआय मनोज एकनाथ कचरे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात भादंवि 302, 504, 506, 507 प्रमाणे संशयीत महेश मराठेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पीएसआय कचरे करीत आहेत. संशयित महेश मराठे फरार आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी मयत निकिता पाटील हीच्या घराच्या वॉलकंपाऊंडच्या मागील बाजूस एका तरुणाचा मृतदेह काटेरी झुडपांमध्ये आढळून आला. सकाळी 8 ते 9 वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पीआय सतीश घोटेकर, एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, पीएसआय मनोज कचरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाचे नाव अनिकेत वाल्मीक बोरसे (वय 30) असल्याचे पोलिसांना समजले. या तरुणाने विष पिवून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
निकिताचा खून झाला त्या घटनेशी अनिकेत बोरसेचा संबंध असल्याचा तर्क लावला जात आहे. अनिकेत बोरसेच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. त्यामुळेच अनिकेतचा निकिताच्या खुनाशी संबंध जोडला जात आहे. घटनास्थळावरील चर्चेनुसार अनिकेत हा निकिताच्या ओळखीचा होता. त्या ओळखीतूनच मैत्रीसंबंध व खून अनिकेतने केला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. अनिकेत हा पांझरा नदीकाठी असलेल्या मोगलाईतील महालेनगर येथील रहिवासी असून घटनास्थळी त्याची सायकलही आढळून आली आहे.