18 वर्षांपासून रखडलेल्या हडसुने एमआय टॅंक प्रकल्पाचे काम मार्गी लावा
धुळे : सन 2005 पासून रखडलेल्या हडसुने एमआय टॅंक प्रकल्पाचे काम मार्गी लावा, अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीसह आदिवासी क्रांती सेनाने केली आहे.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हडसुने ता. धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष भारत चैत्राम देवरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हडसुने येथील गावबल्ली ते भुरीबल्ली हा रखडलेला धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग धुळे यांनी सन 2005 साली मंजूर केला होता. परंतु काही राजकीय दबावामुळे हा प्रस्ताव थांबवण्यात आला.
धुळे तालुक्यातील हडसुने येथील भुरीबल्ली ते गावबल्ली हा प्रकल्प सन २००५ साली मंजूर झालेला होता. या प्रकल्पाचे नाव एमआय टॅंक असे देखील ठेवण्यात आले होते. परंतु काही राजकीय कारणांमुळे या प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन व दुष्काळ निवारणासाठी हडसुने येथील एमआय टॅंकचा प्रस्ताव मंजूर करावा. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करावी, यासाठी हडसुने गावातील सर्व नागरिक तसेच पंचक्रोशीतील विसरणे, बोरविहिर, शिरूड या गावातील शेतकरी वर्गाकडून एमआय टॅंकची मागणी होत आहे. यामुळे हडसुनेसह पंचक्रोशीतील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून या प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना अनिल अहिरे, लक्ष्मण भागवत पवार, ज्ञानेश्वर गिरधर पाटील, राकेश सखाराम पाटील, समाधान मुकुंदा पाटील, काळू शिवाजी अहिरे, राहुल राजेंद्र पाटील, चेतन धनराज पाटील, विलास गोरख पाटील, अरुण मधुकर पाटील, हिम्मत सोनवणे, भटू सुभाष मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.