सालदारे धरण भरण्यासाठी सर्व्हे करण्याच्या आ. कुणाल पाटील यांच्या सूचना
धुळे : निकुंभे ता.धुळे येथील सालदारे धरण अक्कलपाडा डावा कालव्यातून भरण्यासाठी तातडीने सर्व्हे करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या असून सदर धरणात अक्कलपाड्याचे पाणी टाकण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आ.कुणाल पाटील यांनी निकुंभे येथील शिष्टमंडळाशी चर्चा करतांना सांगितले.
अक्कलपाडा डावा कालव्यातून अक्कलपाडा धरणाचे पाणी निकुंभे ता.धुळे येथील सालदारे धरणात टाकण्यात यावे या मागणीसाठी निकुंभे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने आ.कुणाल पाटील यांची आज दि.2 डिसेंबर रोजी भेट घेतली. यावेळी आ.पाटील यांना निवेदन देण्यात आले. निकुंभे येथील सालदारे धरणावर या गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर असून सदर विहीरी कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे निकुंभे गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सालदारे धरण कोरडे झाल्याने यावर अवलंबून असलेल्या सिंचन विहीरीही कोरड्या झाल्या आहेत. धरणात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासह पशुधनाचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. त्यामुळे निकुंभे येथील सालदारे धरणात अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी टाकण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, सद्य स्थितीत सालदारे धरणाचा गाळ काढून त्याची दुरुस्तीचीही मागणी करण्यात आली. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतून धुळे तालुक्यातील सातपायरी व कोठारे धरण भरण्याचे नियोजित आहे. या धरणाच्या जवळच असलेल्या निकुंभे शिवारातील सालदारे व ढबकारे धरणही सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतून भरता येवू शकते.त्यासाठीही प्रयत्न केला जावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी आलेल्या शिष्टमंडळाशी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, सालदारे धरण अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे भरण्यासाठी पाटबंधारे मध्यम प्रकल्पाच्या अधिकार्यांना सूचना देणार असून या धरणात पाणी टाकण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच सालदारे धरणातील गाळ काढणे व दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी निकुंभे येथील कृषीभूषण भिका पाटील, ज्येष्ठ नेते हिरामण शंकर पाटील, सरपंच दादाभाई पाटील, धुळे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपाध्यक्ष एकनाथ वाघ,आनंदा पाटील, उमेश गिरासे, माजी सरपंच चंद्रसिंग गिरासे, मालजी पाटील, कमलाकर पाटील, किशोर पाटील, दिवाण पाटील, सरदार गिरासे, रविंद्र पाटील, पन्नालाल पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा