न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासीना साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य
धुळे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे कार्यक्षेत्रातील धुळे,शिंदखेडा,साक्री व शिरपूर तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्युक्लिअस बजेट योजनेत किराणा व्यवसाय, गवंडी कामासाठी साहित्य, क्रिकेट खेळ साहित्य, भजनी मंडळे, तसेच बचत गटासारख्या उपक्रमांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 26 डिसेंबर, 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
अ गटात- अनूसूचित जमातीच्या 40 लाभार्थ्यांना किराणा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच कामगार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या 50 लाभार्थ्यांना गवंडी कामासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल. क गटात 500 युवकांना क्रिकेट खेळ खेळण्याकरिता क्रिकेट साहित्य संच, 500 भजनी मंडळांना धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भजनी साहित्य, अनुसूचित जमातीच्या बचतगटांचे सक्षमीकरण करण्यासाठी 1 हजार बचतगटांना अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच 20 युवक- युवतींना स्वंय रोजगारासाठी डीजी स्मार्ट सर्व्हिस सेंटर उभे करण्यासाठी प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे.
वरील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे 24 बडगुजर प्लॉट, राम सर्जिकल हॉस्पिटल शेजारी, 80 फुटी रोड, पारोळा चौफुली जवळ, धुळे येथे 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर,2023 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील. तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज 11 डिसेंबर ते 26 डिसेंबर,2023 पर्यंत स्विकारले जातील. मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्विकारले जाणार नाहीत.
पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गवंडी कामासाठी कामगार विभागाकडे नोंदणी केलेले नोंदणीकृत प्रमाणपत्र, क्रिकेट टिम योजनेचा लाभ घेण्यासाठी टिमची यादी, बचतगट नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र तसेच योजना निहाय आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी कळविले आहे.