छात्रसैनिकांनी राबवले पांझरा नदीपात्रात स्वच्छता अभियान
धुळे : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियान अंतर्गत 48 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या छात्र सैनिकांनी शहरातील पांझरा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवले. या अभियानांतर्गत अडीचशे किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. त्यानंतर हा कचरा महापालिकेच्या वाहनातून कचरा डेपोत पाठवण्यात आला.
छात्र सैनिकांनी देवपूर परिसरातील प्रभातनगर येथील हत्ती डोह या पांझरा नदीपात्राजवळील पुलाखाली स्वच्छता मोहीम राबवली. प्लास्टिक कचरा, काटेरी झुडपे व पान वनस्पतींनी नदीपात्र मुक्त करण्यात आले. या मोहिमेत धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय, एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय व जी. ई. टी. नगाव महाविद्यालय येथील 170 छात्रसैनिकांनी सहभाग नोंदवला.
तसेच एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेजच्या छात्रसैनिकांनी पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर जनजागृती करण्यासाठी शहरातील मुख्य भागात नुक्कड नाटिका सादर केल्या. नुक्कड नाटिकेमार्फत प्रदूषणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल व आपल्या भारत देशाला स्वच्छ आणि सुंदर कसे बनवता येईल याबाबत संदेश देण्यात आला.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी 48 महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल एस. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन के.जी. बोरसे, मेजर महेंद्र कुमार वाढे, मेजर के. एम. बोरसे, कॅप्टन सुनील पाटील, लेफ्टनंट शशिकांत खलाणे, लेफ्टनंट क्रांती पाटील, प्रा. प्रशांत वानखेडे, सुभेदार मेजर राजवीर सिंग, हवलदार मनजीत पटियाल व हवालदार उगले यांनी प्रयत्न केले.