शिक्षकांच्या बिंदू नामावली घोटाळ्याबाबत मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रार
धुळे : जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी संस्थांच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांची बिंदू नामावली अद्ययावत करताना निवडसूची विचारात घेऊन आणि निवडप्रवर्ग ग्राह्य धरून भटक्या जमाती क प्रवर्गाच्या अतिरिक्त जागांची समस्या सोडवावी, अशी मागणी आर्वी त्या. धुळे येथील विलास पोपट पाटील (9527486507) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाच्या सहायक आयुक्तांना नुकतेच निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागात मागासवर्गीय उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होऊनसुद्धा संबंधित शिक्षकाच्या मूळ नियुक्ती आदेशावर कोणत्याही निवडीचा प्रवर्ग उल्लेख नसताना सदर शिक्षकाला मागासवर्गीय बिंदूवर दाखवले जात आहे. ही बिंदू नामावली तयार करताना त्या त्या भरती वर्षाच्या निवड सूचींचा आधार न घेता मागासवर्गीय उमेदवारांची खुल्या प्रवर्गात निवड होऊनसुद्धा सध्याची बिंदू नामावली प्रमाणित करत असताना पुन्हा मागासवर्गीय बिंदूवर दाखवून अन्याय केला जात आहे. सदर बिंदू नामावली तपासणी करताना निवडसूची, शासन परिपत्रक, अधिनियम याचा कुठेही वापर केलेला दिसत नाही. तथापि, बिंदू नामावलीची नियमानुसार पूनर्तपासणी न झाल्यास भविष्यात होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल, असा इशारा दिला आहे.
या आहेत महत्त्वाच्या मागण्या
1. बिंदू नामावली घोटाळ्यामुळे भटक्या जमाती क प्रवर्गाच्या जागा नेहमीच अतिरिक्त होतात. धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व जिल्हा परिषद, महानगरगरपालिका, शिक्षण अधिकारी आणि आयुक्तांना निवेदने, RTI चे अर्ज दिलेले आहेत. त्याची दखल घ्यावी.
2. दि. 25/5/1990 पूर्वीच्या धनगर जातीच्या सरळ सेवेद्वारे नियुक्त शिक्षकास बदली किंवा बढतीच्या वेळेस इतर मागास (ओबीसी) किंवा खुला असे नियुक्त प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवले जाणे गरजेचे होते. परंतु त्या नियुक्त्या भज क प्रवर्ग तेव्हा अस्तित्वात नसताना भज क मध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत.
3. दिनांक 25/5/90 ते दिनांक 23/3/1994 या कालावधीत धनगर समाज विजाभज एकत्रित प्रवर्गात होता. सरळ सेवेद्वारे नियुक्त झालेल्या धनगर जमातीच्या शिक्षकाची नियुक्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती एकत्रित प्रवर्गातून किंवा ओपन प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवलेली असणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही.
4. दिनांक 23/03/1994 रोजी भटक्या जमाती-क (NTC) हा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण झाला. या दिनांकापासून हिंदू धनगरांना एनटी सी या प्रवर्गात दाखवावे.
5. दिनांक 18/6/1994 शासन निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये धनगर जमातीला आरक्षण नसल्याने दिनांक 18/10/1997 पर्यंत धनगर जमातीतील उमेदवारास खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवले जाऊन त्यांच्या रिक्त जागा धनगर जमातीतील उमेदवारांना दिले जाणे गरजेचे होते, असे झाले नाही.
6. ज्या शिक्षकांची निवड ओपनमधून झालेली आहे. त्यांना open मध्येच दर्शवावे आणि त्यांना पदोन्नतीही ओपनमधूनच द्यावी.
7. बिंदूनामावली तपासणी नियुक्ती आदेशानुसार होणे आवश्यक आहे. परंतु सेवा पुस्तकातील जातीच्या नोंदीवरून बिंदूनामावली पडताळणी केली जाते. म्हणून आमचा बिंदू नामावलीवर आक्षेप आहे.
8. उर्दू , बंगाली या माध्यमात शिक्षक भरतीची भटक्या जमाती क प्रवर्गाच्या जागांची जाहिरात 2010, 2017 आणि त्याअगोदरच्या भरतीतही दिली आहे. या माध्यमात शिक्षण घेणारे धनगर उमेदवारच नाहीत. उर्दू , बंगाली माध्यमात या जागा रिक्तच राहतात. त्या जागांवर मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या इंग्रजी, हिंदी, मराठी विषयाच्या गुणवत्तापूर्ण अभियोग्यताधारकांची नियुक्ती करण्यासाठी पवित्र पोर्टलवर पर्याय उपलब्ध करून द्यावा.
9. 2017 च्या शिक्षक भरतीत रयत शिक्षण संस्थेत १०२२ पदांची भरती झाली. त्यात एनटीसी प्रवर्गाला शून्य जागा होत्या. नियमानुसार बिंदू नामावली तपासल्यास सर्व संस्थांवर आरक्षणानुसार आमच्या जागा येतील.
10. सन 2017 च्या एकूण सहा हजार पदांच्या शिक्षक भरतीत भज क ला 164 जागा होत्या. त्यात उर्दू माध्यमाला 78 जागा आल्या आणि मराठी माध्यमाला 86 जागा होत्या. उर्दू माध्यमात आमच्या भाषा विषय शिक्षकांना संधी न मिळाल्याने त्या जागा रिक्त राहिल्या आणि आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत.
11. सन 2010, 2017 च्या भरतीत जागा कमी आणि सध्या अतिरिक्त ही परिस्थिती सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, संस्था अशी सगळीकडे आहे. तेरा वर्षात कोणतीही मोठी शिक्षक भरती झालेली नाही. तरीही शिक्षक अतिरिक्त का होत आहेत? याचा सखोल अभ्यास करावा.
12. ग्रामविकास विभागाचे शिक्षण सचिव, शालेय व क्रीडा विभाग सचिव, मागासवर्ग कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शिक्षण परिषद आयुक्त पुणे, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी या सर्वांना यासंबंधी सूचना द्याव्यात.
13. शिक्षणमंत्र्यांनी सर्व जिल्हा परिषदांना आणि कोकण, नागपूर, पुणे, अमरावती, संभाजीनगर, नाशिक या सर्व प्रशासकीय विभागात मागासवर्ग विभागाला बिंदूनामावली पुन्हा तपासणीचे आदेश द्यावेत.
14. दिनांक 18 मे 2023 रोजी धनगर समाजातील अभियोग्यताधारकांनी शिक्षण आयुक्तांना एनटी सी प्रवर्गाचा रोस्टर घोटाळा काढावा, यासाठी निवेदन देऊन देखील 20 जुलै 2023 रोजी ओपन प्रवर्गाची बिंदू नामावली तपासणीबाबत पत्राद्वारे आदेश काढण्यात आले. एन. टी. सी. प्रवर्गाने त्या अगोदर निवेदन दिलेले असतानाही त्याचा उल्लेख 20 जुलैच्या पत्रात केलेला नाही. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची प्रशासनाने कधीच दखल घेतली नाही.
15. 21 ऑगस्ट 2023 रोजी पुराव्यासह सूरज मांढरे, आयुक्त यांना निवेदन दिले होते. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मार्फत श्रीराम पानझडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. तरीही 1982 ते 2000 दरम्यान झालेल्या शिक्षक भरतीच्या निवड याद्या लक्षात घेवून बिंदू नामावली तपासणी केली जात नाही.
16. सध्याच्या बिंदू नामावली तपासणीवर आमचा आक्षेप असून, कार्यरत शिक्षकांच्या निवड याद्या आणि बदली झाल्यानंतर बदलण्यात आलेला प्रवर्ग लक्षात घेवून घोटाळा बाहेर काढल्यास कोकणासह प्रत्येक विभागात भज क प्रवर्गाचा सर्वात जास्त अनुशेष बाहेर निघेल. ही बिंदू नामवली दुरुस्ती केल्याने एनटी सी या प्रवर्गाला सध्याच्या भरतीत 3000+ जागा उपलब्ध होतील. जर ही बिंदू नामावली त्रुटी काढण्यास सरकार किंवा प्रशासन असमर्थ ठरत असेल तर येणाऱ्या शिक्षक भरतीत मराठी माध्यमात एनटीसी या प्रवर्गाला सरसकट 2500+ जागा देऊन आजवर एनटी सी प्रवर्गावर होत असलेला अन्याय दूर करावा.
या अन्यायासंदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आधीच आयुक्त सूरज मांढरे यांना फोनवरून माहिती दिली आहे. वेळोवेळी अर्ज, विनंत्या, निवेदने देवूनही आमची दखल न घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधवांनी जिल्हा परिषद कार्यालयात तोडफोड सुद्धा केली. सदर अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहिती पंधरा दिवसात दिलेल्या ईमेल आणि पत्त्यावर कळवावी. अन्याय दूर करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करून सूचना द्याव्यात. अन्यथा आमरण उपोषण, न्यायालय किंवा अन्य मार्गाचा अवलंब झाल्यास त्यास पूर्णत: निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
Comments 1