अवाजवी घरपट्टी रद्द करण्याची आमदार फारुख शाह यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
धुळे : शहराच्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न बिकट झालेला आहे. महानगरपालिकेने आकारललेली अवाजवी घरपट्टी रद्द करावी म्हणून धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांचा असंतोष मांडून अवाजवी घरपट्टी रद्द करण्याची मागणी केली.
धुळे शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न करता घरपट्टीमध्ये अवाजवी वाढ केलेली आहे. त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध न करता वाढीव घरपट्टी लावून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. इतर महानगरपालिकांच्या तुलनेत धुळे महानगपालिकेची कर आकारणी जास्त आहे. तरीही नागरिक मनपाला कर अदा करीत असतात. मात्र महापालिका जबरदस्ती करून वसुली करते.
वास्तविक पाहता पहिले सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मग वसुली करायला हवी. शहरातील बेरोजगारी पाहता धुळे मनपाची वाढलेली घरपट्टी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी आमदार फारुख शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून केली.