गुटखा किंगवर मोक्कांतर्गत कारवाई करा, आरपीआय आंबेडकर गटाची मागणी
धुळे : जिल्ह्यातील गुटखा किंगवर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्ह्यामधून गुटखा हद्दपार करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने केली. आरपीआय आंबेडकर गटाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन दिले.
धुळे जिल्ह्यात मध्यप्रदेशमधून गुटखा मागविणारे व धुळे जिल्ह्यात सरासपणे प्रत्येक पान दुकान, किराणा दुकान, हॉटेल्सवर गुटखा पुरविणारा गुटखा किंगचा तपास लावून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि धुळे जिल्ह्यातून गुटखा हद्दपार करावा, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गटाचे जिल्हाध्यक्ष दिनेश निकुंभ यांनी दिले.
धुळे शहरापासून मध्यप्रदेश व गुजरात या दोन्ही सीमा जवळ असल्यामुळे जिल्ह्यात तस्करीचे प्रमाण वाढताना दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नवयुवक कमी वयातच वाईट मार्गाला लागतात. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात करोडो रूपयांचा गुटखा पकडून मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यात गुटखा, अवैध दारू मागविण्यात कोणाचा हात आहे? एवढा पैसा कोणता गुटखा किंग गुंतवणूक करतो? याचा तपास करताना पोलीस दिसत नाहीत, असा आरोप या निवेदनात केला आहे. कोणाचाही धाक न बाळगता राजरोसपणे गुटखा विकला जातो. त्यात काही कर्मचारीसुध्दा ड्युटीवर असताना गुटखा खाताना आढळून येतात.
तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रायव्हेट कारमध्ये २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरच्या दरम्यान मध्यप्रदेशमधील बर्हाणपूर येथील गुटखा किंग म्हणून ओळखला जाणारा नामचिन गुंड गुटखा व्यापारी विक्की डियालाणी याला त्यांच्या लालबाग थाना पोलीस स्टेशन बर्हाणपूर हद्दीमध्ये अटक केली होती. त्याच्यावर कारवाई न करता सोडून देण्यात आले होते. त्याच्यावर कारवाई का नाही केली याची चौकशी करून त्या गुटखा किंगला परत अटक करून ताबा घेतल्यास धुळे जिल्ह्यात किती गुटखा व्यापारींना गुटखा तस्करी करतो त्यांची नावे समोर येतील. आपल्या या कारवाईने अनेक युवकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात.
महाराष्ट्रात अवैध गुटखाच्या सेवनाने कॅन्सरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वयात आईवडिलासमोर मुलांना कॅन्सरमुळे आपला जिव गमवावा लागत आहे. त्यामुळे गुटखा किंग कोण आहेत हे लवकरात लवकर शोधून यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्ह्यामधून गुटखा हद्दपार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
हेही वाचा