दराणे येथील डॉ. प्रेमसिंग गिरासे खून खटल्यातील दोन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
धुळे : सोनगिर-दोंडाईचा रोडवर चिमठाणे सबस्टेशनजवळ झालेल्या प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे खून खटल्यातील आरोपी शाम युवराज मोरे आणि संदिप फुलचंद पवार या दोंघांना भादंवी कलम 302 आणि 394 या दोन कलमान्वये जन्मठेपेची दुहेरी शिक्षा धुळे न्यायालयाने ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी हा ऐतिहासीक निकाल दिला. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता गणेश वाय. पाटील यांचा युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. सहा सप्टेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजता हा खून झाला होता.
खून खटल्याची घटना अशी : 06 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेच्या सुमारास मयत डॉ. प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे, जगदिश जयसिंग परमार, समाधान ईश्वरसिंग गिरासे हे तिघे शिंदखेडा येथून नविन मोटार सायकल खरेदी करून दराणे येथे जात होते. प्रेमसिंग हे मोटारसायकलवर एकटे होते. दरम्यान, त्यांच्याकडून मोटारसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चाकुहल्ला झाला. छातीवर व हृदयाजवळ तसेच उजव्या पायाच्या मांडीवर चाकु भोसकून खून करण्यात आला. मारेकऱ्यांनी मोटारसायकलसह मोबाईलही चोरून नेला. पोलिसांनी या गुन्ह्याचा प्राथमिक तपास केल्यानंतर प्रेमसिंग यांचा खून आरोपी शाम युवराज मोरे, राकेश रोहिदास मोरे व संदिप फुलचंद पवार यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून मोटारसायकल आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला
याप्रकरणी जगदिश परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस स्टेशनला भादंवी कलम 394, 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील बी. भाबड यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून केला न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश – 1 यांच्या न्यायलयात झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 16 साक्षीदारांची महत्वपूर्ण साक्ष नोंदविण्यांत आली. त्यात फिर्यादी जगदिश परमार, दीपक बावीस्कर, बाळू धनगर, डॉ. साधना पाटील, समाधान गिरासे, मुकेश धनगर, योगेश दिलीपसिंग राजपूत, ईश्वर चव्हाण, निलेश पाटील, हंसराज चौधरी, आशिष भामरे, जितेंद्र राजेंद्र पवार आणि पोलीस निरीक्षक सुनील भाबड या साक्षीदारांचे महत्वपूर्ण जबाब नोंदविण्यांत आलेत.
विशेष म्हणजे सदर खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हाता. तथापी, साक्षीदार देवेंद्र विश्वासराव बोरसे व जगदिश विक्रम निकम या पंच साक्षीदारांसमक्ष दोन्ही आरोपींनी स्वखुशीने निवेदन देवून आरोपी शाम याने मयताची नवीन मोटारसायकल जी दरोडा टाकून चोरून नेली होती व मयताचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू काढून दिला. तसेच आरोपी संदिप याने मयताचा मोबाईल जो दरोडा टाकून चोरून नेला होता तो काढून दिला. त्याच प्रमाणे आरोपींच्या कपडयांवर रक्ताचे डाग मिळून आले. तसेच आरोपी शाम याने काढून दिलेल्या चाकूवर असलेल्या मयताच्या रक्ताचे डाग व मयताचे रक्त हे एकच असल्याचे रासयनिक विश्लेषण अहवालात निष्पन्न झाले.
सदर खटल्यात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश वाय. पाटील यांनी साक्षीदारांची साक्ष व इतर तपासण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विशश्लेषणाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत आरोपीना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी असा युक्तीवाद केला.
सदर कामात जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी सदर खटल्यातील सर्व पुराव्यांचा व सर्वोच्च न्यायालयाने, दिलेल्या निकालांचा सांगोपांग विचार करुन आरोपीस भा.द.वि. कलम 302 व 394 प्रमाणे प्रत्येकी दोन्ही कलमांमध्ये आरोपी शाम युवराज मोरे (घटनेच्या वेळी वय 26 वर्षे) व संदिप फुलचंद पवार (घटनेच्या वेळी वय – 25 वर्षे) यांना दुहेरी जन्मठेपेची ऐतिहासीक शिक्षा तसेच दहा हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्त मजूरीचा शिक्षेचा आदेश केला.
तसेच मयताचे पालक यांना नियमानुसार जिल्हा विधी सेवा प्राधीकरण मार्फत पीडित नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले आहे. एकाच आरोपींना दोन वेगवेगळ्या कलमांखाली जन्मठेप ठोठावण्याची धुळे जिल्हातील ही पहिलीच शिक्षा आहे. यातील अन्य एक आरोपी राकेश रोहिदास मोरे यांस निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश वाय. पाटील यांनी काम पाहिले. सदर खटला प्रकरणी जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार देत आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी युक्तिवाद केला. तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल एल. आर. कदम यांचे सहकार्य लाभले. सदर प्रकरणात संपूर्ण शिंदखेडा परिसराचे लक्ष लागुन होते.