तापीचे पाणी दोन वर्षांत शेतात : खासदार डॉ. सुभाष भामरे
धुळे : शेतकऱ्यांचे अनेक दशकांपासूनचे सिंचनाचे स्वप्न साकार करण्यासाठी खासदार म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करत विशेष बाब म्हणून सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल दोन हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आणला. या प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वास आले असून, येत्या काही महिन्यांत या प्रकल्पात अक्कलपाडा प्रकल्पापेक्षा साडेतीन पटीने अधिक जलसाठा होणार आहे. येत्या दोन वर्षांत तापीमाईचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये खळखळ वाहू लागेल, अशी ग्वाही माजी संरक्षण राज्यमंत्री तथा लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारतर्फे देशभरातील विविध गावांत विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. ही रथयात्रा शनिवारी (ता. १६) मेलाणे (ता. शिंदखेडा) येथे आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. भामरे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संजीवनी शिसोदे, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी कपिल वाघ, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, समुदाय आरोग्याधिकारी डॉ. मोरे, मेलाणेच्या सरपंच निर्मला बोरसे, उपसरपंच योगेश भिल, ग्रामपंचायत सदस्या सरला बोरसे, लोपबाई बोरसे, उषाबाई ठाकरे, सदस्य दत्तात्रय बोरसे, राजाराम बोरसे, माजी सरपंच गंपू बोरसे, विजय बोरसे, पोलिस पाटील ब्रिजलाल बोरसे, सीताराम फुले, हिलाल भिल, नंदलाल मोरे यांच्यासह आरोग्य, बांधकाम, रोजगार हमी योजना, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचितांना योजनांच्या लाभातून न्याय : खासदार डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारतर्फे देशातील विविध घटकांच्या विकासासाठी ७० हून अधिक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे समाजातील विकासच्या प्रवाहापासून दूर असलेल्या वंचित घटकांचा विकास साधत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. यातून विकसित भारताचा संकल्प साकारण्यासाठी मदत होत आहे. यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते गावातील महिला, पुरुष लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डसह विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत मोदी सरकारच्या योजनांची माहितीही दिली.
नरडाण्याच्या विकासाला चालना : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संजीवनी शिसोदे म्हणाल्या, की विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आपले खासदार डॉ. सुभाष भामरे स्वतः जातीने गावागावांत जाऊन ग्रामस्थांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी झटत आहेत. खासदार डॉ. भामरे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून नरडाणा-मेलाणे- जातोडे रस्ता बनविला. त्यांच्या प्रयत्नांमुळे उद्योगांसाठी आवश्यक महामार्गांचे जाळे, सुलवाडे-जामफळ योजनेद्वारे पाण्याची उपलब्धता, तसेच धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. यातून नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग वाढू लागले आहेत. त्यामुळे मेलाणे, जातोडे गावांसह नरडाणा परिसराच्या विकासाला चालना मिळू लागली आहे. यामुळेच नरडाणासह परिसरातील मतदार भाजपच्याच पाठीशी राहतील, अशी ग्वाहीही सभापती शिसोदे यांनी यावेळी दिली.
बिलाडी येथेही संकल्प यात्रा : बिलाडी (ता. धुळे) येथेही शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. तेथे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते गावातील महिला, पुरुष लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशभरातील विविध गावे, शहरांतील लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रशेक्षण दूरचित्रवाणीवर दाखविण्यात आले. तसेच ड्रोनद्वारे शेतातील पिकांवर कीटकनाशकांच्या व खतांच्या फवारणीचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखविण्यात आले. यावेळी भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, नेते उत्कर्ष पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, रितेश परदेशी, पंचायत समिती सदस्या उषाताई पाटील, सुभाष पाटील, हरीश शेलार, सरपंच अरस्तोलबाई खैरनार, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी केंद्रप्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण पवार, संजय देवरे, कृषी सहाय्यक कमलेश सूर्यवंशी, मंडलाधिकारी राकेश परदेशी, उपसरपंच विनोद ठाकरे, देविदास ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, आसाराम पाटील, सुभाष पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.