धुळ्यात पाच लाखांचा गांजा पकडला, धुळे एलसीबीची कारवाई
धुळे : शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुलीवर केलेल्या एका कारवाईत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका ट्रकमधून पाच लाखांचा गांजा पकडला. गांजाचा हा माल गुजरात राज्यातील सुरतला जात असल्याची टिप एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार छापा मारून पोलिसांनी गांजाची तस्करी रोखली.
याप्रकरणी ट्रकचालक आबिद हुसैन शेख (रा. नुर मशिद, 80 फुटी रोड, शिवाजीनगर, धुळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. एकाच्या सांगण्यावरून हा माल सुरतला घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्य संशयिताला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
22 लाखांचा मुद्देमाल जप्त : पाच लाख एक हजार 375 रूपयांचा गांजा, 12 लाखांचा ट्रक, तीन लाख 37 हजार 869 रुपये किंमतीची ट्रकमध्ये भरलेली सरकी, दोन लाख 50 हजारांचे फटाक्यांचे 153 बॉक्स असा एकूण 22 लाख 89 हजार 244 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली येथे एम.एच.18 ओ.ओ. 1268 क्रमांकाचा ट्रक उभा असून त्यात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणार्या मादक पदार्थ असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना काल मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश केले. पथकाने शोध घेतला असता चाळीसगाव रोड चौफुली जवळील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपालगत असलेल्या मोकळया जागेत संशयीत ट्रक उभा दिसून आला. ट्रक चालकाने त्याचे नाव आबिद हुसैन शेख (रा. नुर मशिद, 80 फुटी रोड, शिवाजी नगर, धुळे) असे सांगितले. ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या कॅबिनमध्ये हिरवट पिवळसर अर्धवट सुकलेला पाने, बिया, काडया असलेल्या उग्र वासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला. त्याने हा माल धुळ्यातील एकाच्या सांगण्यावरुन सुरत येथे विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी कॉन्स्टेबल गुणवंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आबिद हुसैन शेख याच्यासह दोघांविरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई : ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, सुरेश भालेराव, पोलीस नाईक रविकिरण राठोड, कॉन्स्टेबल गुणवंत पाटील, निलेश पोतदार, सुशिल शेंडे, सागर शिर्के, हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली.
हेही वाचा